अग्निशमन दलाची वेळीच धाव : जीवितहानी टळली
प्रतिनिधी / संकेश्वर
बेळगाव येथून काम आटोपून निपाणीकडे परतत असताना अचानक कारने पेट घेतल्याची घटना पुणे-बेंगळूर महामार्गावर संकेश्वर येथील हॉटेल साई पार्कनजीक घडली. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निपाणी येथील प्रवीण खोत हे कामानिमित्त आपल्या टोयोटा कोरोला या कारमधून बेळगावला गेले होते. सोमवारी बेळगाव येथील काम आटोपून निपाणीकडे परतत असताना सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांची कार संकेश्वर येथे महामार्गानजीक असलेल्या हॉटेल साई पार्कजवळ आली असता कारच्या टायरमधून आग येत असल्याचे प्रवीण खोत यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून ते बाहेर आले. बघता बघता आग वाढत जाऊन आगीने संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले.
बर्निंग कारचा हा थरार पाहण्यासाठी एकच गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यामध्ये कारचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले असून, सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलिसांत झाली आहे.