वार्ताहर/ कराड
संक्रांतीच्या सणाला महिला वर्गात वाण वाटण्याची परंपरा आहे. हळदी-पुंकवाला येणाऱया महिलांना वाण म्हणून एखादी वस्तू देण्यात येते. त्यासाठी वाणाच्या साहीत्यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. तर मंडई परिसरात वाणांच्या साहित्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पारंपरिक वाणाच्या साहित्याबरोबरच यावर्षी मॅगी बाऊल, सुप बाऊल आदी नवीन प्रकारचे साहित्यही बाजारात दाखल झाले आहे.
बुधवार 13 रोजी भोगी तर गुरूवारी संक्रातीचा सण साजरा होत आहे. संक्रातीच्या निमित्ताने महिला वर्गातून मोठय़ा प्रमाणात वाणाचे साहित्य खरेदी करण्यात येते. हळदी-पुंकवाचा करंडा, कंगवा, रुमाल, शांपू, किचेन, साबण, ब्रश, स्क्रबर, आदी प्रकारच्या साहित्याचा वाणात सामावेश होतो. बदलत्या काळाबरोबरच वाणाच्या साहित्यातही आता बदल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. स्वयंपाक घरात महिलांना नेहमी लागणाऱया साहित्याचा समावेश संक्रातीच्या वाणात झाला आहे. सध्या बाजारात सॉस बॉटल, गोल्डन व सिल्व्हर फॅन्सी ट्रे, ट्रव्हलिंग पाऊच, फूड बाऊल, गाळणी, स्क्रबर, पाणी बॉटल, मॅगी बाऊल, सुप बाऊल, सिल्वर प्लेटेड कोयऱया,गोल्ड प्लेटेड करंडे आदी प्रकारचे नवनवीन साहित्य वाण म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
भोगी व संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने महिलावर्गात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. महिला वर्गातून खास संक्रातीच्या सणाच्या निमित्ताने घरांची झाडलोट करण्यात येत आहे. दोन दिवसांवर संक्रातीचा सण आल्याने घरच्या साफसफाई बरोबरच वाण खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे.