असोगा-खानापूर-कुंभार्डा-नंदगड येथील तिर्थस्थाने पाहण्यास अनेक भाविक दाखल : मंदिरात घेतले देवदर्शन
बातमीदार / खानापूर
मकर संक्रांतीनिमित्त दोन दिवस खानापूर तालुक्यातील असोगा, खानापूर, कुंभार्डा व नंदगड येथील तीर्थक्षेत्रावर भाविकांनी अमाप गर्दी केली होती.
मकरसंक्रांती व कंक्रांतीनिमित्त गुरुवारी व शुक्रवारी मलप्रभा नदीकाठावरील असोगा रामलिंग देवस्थानवर भाविकानी गर्दी केली होती. असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिराशेजारीच मलप्रभा नदीचे पात्र आहे. शिवाय पाणीही बऱयापैकी राहिल्याने अनेकांनी मलप्रभा नदीपात्रात स्नानाचा लाभ घेतला. रामलिंगेश्वराचे दर्शन व परिसरातील विलोभनिय दृष्य यामुळे भाविकांना एक दिवसाच्या सहलीचाच आनंद घेता आला. खानापूर शिवस्मारक सर्कलपासून असोगा गावापर्यंत खासगी वाहनांची सोय होती. शिवाय दुचाकी ट्रक्टरवरुन जाणाऱयांची संख्याही अधिक होती. देव दर्शनाबरोबरच मित्र परिवारांची भेटही या ठिकाणी झाल्याने तिळगूळ घ्या गोड बोला… म्हणण्याची संधीही अनेकांना मिळाली. खानापूर शहराच्या मलप्रभा नदीघाटावरही भाविकांनी मलप्रभा स्नानाचा लाभ घेतला. तेथील पंचमुखी महादेवाच्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली होती. खानापूर, बेळगाव व परिसरातील अनेक भाविक मिळेल त्या वाहनाने सकाळपासून येथे गर्दी करू लागले. अनेकांनी मलप्रभा नदीत स्नान करून नदी पूजा व नदी परिसरात स्वयंपाक बनवून त्याचा प्रसाद म्हणून लाभ घेतला.
नंदगड संगोळी रायण्णा समाधीचे भाविकांकडून दर्शन
बालचमूंसह पालकवर्गानीही नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णांच्या समाधीला भेट दिली. या भेटीमुळे अनेकांना संगोळ्ळी रायण्णांच्या स्मृतिना उजाळा मिळाला. त्यामुळे दोन दिवस समाधी व फाशीस्थळ परिसरात मोठी गर्दी दिसून येत होती.
कुंभार्डा-हंडीभडंगनाथ मठावरही गर्दी
कुंभार्डा येथील नाथपंथिय हंडीभडंगनाथ मठावरही दर्शनासाठी खानापूर, अळणावर, बिडी, हल्याळ, लोंढा, रामनगर, नंदगड परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.