प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था मण्णूर आणि कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ आयोजित संगणक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ चिंतामणराव हायस्कूल, शहापूर येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य एम. एन. सिंदूर, बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, उमेश कुलकर्णी तसेच सय्यद मुजावर, प्रिया सायनेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते.
प्रारंभी राम गुरव यांनी सरस्वती स्तवन सादर केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. संगणक शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक शिक्षकांनी ते आत्मसात केले पाहिजे, असा संदेश रवी बजंत्री यांनी दिला. प्रमुख पाहुणे प्राचार्य एम. एन. सिंदूर यांनी कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता विद्यार्थ्यांसाठी असे अनेक उपक्रम आपण राबविणार असल्याचे जाहीर केले. याची सुरुवात मराठी माध्यमापासून झाली ही चांगली बाब आहे, असे ते म्हणाले.
शिक्षकांच्यावतीने जोतिबा अगसीमनी, शिक्षिका वंदना कामत यांनी मनोगत व्यक्त केले. युवराज पाटील यांनी अहवाल वाचन केले. समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात एकनाथ पाटील यांनी डाएटचे आभार मानले. भविष्यात असे उपक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले. आभार सुभाष बराटे यांनी मानले.