कुलूप उघडून चोरटय़ांनी दागिने, रोकड लांबविली
प्रतिनिधी/ बेळगाव
संगमेश्वरनगर येथील एका बंद घराच्या पाठिमागील दरवाजाचे कुलूप उघडून चोरटय़ांनी 15 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. शुक्रवारी रात्री 9.15 ते 11 यावेळेत ही घटना घडली असून केवळ पावणे दोन तासांत चोरटय़ांनी आपली करामत दाखविली आहे.
बनावट चाव्यांच्या मदतीने कुलूप व तिजोरीचे कुलूप उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
यासंबंधी गौसमोदीन मैनुद्दीन तोरगल (रा. बाशिबनदर्गा) यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरटय़ांनी 14 लाख 10 हजार रुपये किमतीचे 470 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1 लाख रुपये रोकड पळविली आहे.
गौसमोदीन यांची बहीण जाफरीयाबानु या शुक्रवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या पाठिमागील दरवाजाला कुलूप लावून नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेल्या होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
जाफरीयाबानु या विवाह समारंभानिमित्त जाणार होत्या. त्यामुळे त्यांनी समोरच्या दरवाजाला आतून कडी लावून पाठिमागील दरवाजाला बाहेरुन कुलूप लावले. होते. चोरटय़ांना अंदाज येवू नये म्हणून त्यांनी ही युक्ती केली होती. मात्र चोरटय़ांनी बनावट चावीचा वापर करुन 15 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे.
पाळत ठेवून केली चोरी
एकंदर घटनाक्रम लक्षात घेता चोरटय़ांनी पाळत ठेवून घरफोडी केल्याचा संशय बळावत चालला आहे. घरात कोणी नाही याची कोणाला कल्पना येवु नये म्हणून समोरच्या दरवाजाला आतून कडी लावण्यात आली होती. तरीही चोरटय़ांनी पाठिमागील दरवाजा व कपाटाला लावलेले कुलूप बनावट चावीने उघडले आहे. यावरुन चोरटय़ांनी पाळत ठेवून हे कृत्य केल्याचा संशय बळावला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.