प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर येथील व्यापारी आणि व्यापारी पैसा फंड संस्थेचे संचालक श्रीराम तुकाराम उर्फ दादा वनकर ( ६८ ) यांचे अपघातानंतर उपचार सुरु असताना निधन झाले. वनकर यांच्या अकाली निधनानंतर संगमेश्वर व्यापारी संघ आणि व्यापारी पैसा फंड संस्था यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करुन तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
श्रीराम वनकर यांनी जवळपास ४० वर्षे संगमेश्वर येथे व्यापार केला. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी व्यापारातून निवृत्ती घेतली होती. संगमेश्वर लायन्स क्लबचे सदस्य, व्यापारी पैसा फंड संस्थेचे सदस्य, व्यापारी संघाचे सदस्य अशा विविध ठिकाणी त्यांनी कार्य केले होते. हसतमुख, मितभाषी आणि परोपकारी म्हणून त्यांची संगमेश्वर, धामणी परिसरात ओळख होती. धामणी येथील आपल्या निवासस्थानापासून जवळच महामार्गाच्या साईडपट्टीवरुन पायी जात असतांना कंटेनरने त्यांना पाठीमागून धडक दिली.
ही धडक एवढी मोठी होती की, त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि सुरु झालेला रक्तस्त्राव थांबत नव्हता. वनकर यांना तातडीने रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.