बळ्ळारी / वृत्तसंस्था
माजी आशियाई पदकजेता सुमित संगवानचा (86 किलोग्रॅम) येथील पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दिवशी विजय संपादन करणाऱया खेळाडूंमध्ये प्राधान्याने समावेश राहिला. इन्स्पायर इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्समध्ये आयोजित या स्पर्धेत संगवानने आंध्र प्रदेशच्या हरिश प्रसादुलाला सहज पराभूत केले.
2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट झालेल्या हरियाणाच्या संगवानला पहिल्या फेरीतील सामन्यात विजय संपादन करण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत. 2019 प्रेसिडेन्ट कपमधील सुवर्णजेता नीरज स्वामीने 48 किलो वजनगटात दमदार प्रदर्शन साकारत हरियाणाच्या सागरविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला.
पंजाबच्या राजपिंदर सिंगने हिमाचल प्रदेशच्या राहुल निल्तूला 54 किलोग्रॅम वजनगटात 5-0 असे एकतर्फी नमवले. 75 किलो गटात महाराष्ट्राचा निखिल दुबे व छत्तीसगडचा दिनेश कुमार यांनीही पहिल्या फेरीत दमदार विजय नोंदवले. निखिल पहिल्या फेरीत गुजरातच्या सेजद लिल्गारविरुद्ध स्टॉपेजने जिंकला तर दिनेशला बंगालच्या अभिषेक शॉविरुद्ध 3-2 फरकाने विजय मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला.
ही स्पर्धा 13 नव्या वजनगटातून खेळवली जात असून दि. 21 रोजी अंतिम सामने रंगणार आहेत. या स्पर्धेतील सुवर्णजेते बेलग्रेड-सर्बिया येथे होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी थेट पात्र ठरतील. सर्बियातील ही स्पर्धा दि. 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. सुवर्ण व रौप्य जिंकणाऱया मुष्टियोद्धय़ांना राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात थेट प्रवेश मिळेल. राष्ट्रीय चॅम्पियनशिपनंतर निवड चाचणी होणार असून त्यात प्रत्येक वजनगटातून 2 मुष्टियोद्धय़ांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार आहे.