गिरिजाताई संगीत संमेलन उत्साहात
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
संगीत संमेलनाली राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या सादरीकरणामुळे स्थानिक कलाकारांना आत्मपरिक्षणाची उत्तम संधी लाभत असते. कोविड महामारीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच गोव्यातील कलाक्षेत्रावर मोठा परिणाम झाला. गोव्यातील कलावंताना आणि रसिकानाही त्याची झळ बसली. संगीत हे शाश्वत आहे, चिरकाल आनंद देणारे आहे. म्हणूनच संगीत क्षेत्रातील साधकांनी संगीताची मनोभावे सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
32 व्या स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळेकर संगीत समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फोंडा पत्रकार संघ आणि गिरीजाताई संगीत संमेलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने फर्मागुडी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या प्रांगणात शनिवारी हा संगीत समारोह पार पडला. मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते दीप प्रज्वलीत करुन व गिरीजाताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या संगीत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, स्वागताध्यक्ष धर्मानंद गोलतकर, आयोजन समिती अध्यक्ष नारायण नावती, संमेलनाध्याक्ष जयंत मिरींगकर, महिला अध्यक्ष सौ. दीपा मिरींगकर तसेच पत्रकार नरेंद्र तारी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोविड काळातील पत्रकारांचे संगीत संमेलन हे एकमेव अधिकृत संमेलन असल्याचे सांगून शासकीय पातळीवर विविध कला संबंधीत संस्थांचे सांस्कृतिक उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती पुढे बोलताना मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
नारायण नावती म्हणाले, संमेलनाचा हा नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी संमेलन समिती बांधिल आहे. जयंत मिरींगकर यांनी यंदा सर्व अडचणीवर मात करुन हे संमेलन घडवून आणण्यामागे रसिक आणि कलाकारांचाच अधिक विचार असल्याचे सांगितले.
स्वराली मावजेकर यांनी गणेशवंदना सादर केली. त्यांना दामोदर च्यारी व ग्रजेश तारी यांनी साथसंगत केली. सरपंच राजेश नाईक यांच्याहस्ते स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. धर्मानंद गोलतकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गाकुमार नावती यांनी तर नरेंद्र तारी यांनी आभार मानले.
सांगीतिक सत्राच्या प्रारंभी पुणे येथील प्रथितयश गायक ईश्वर घोरपडे यांनी राग पुरिया धनश्री सादर केला. त्यांना तबल्यावर पं. तुळशीदास नावेलकर, संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, तानपुऱयावर साई तेजस व ऋषिकेश साने यांनी साथ दिली. नाटय़संगीत रजनीने संमेलनाची सांगता झाली.