प्रतिनिधी / बेळगाव
न्यायालय आवारामध्ये वाहने पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहने पार्क करण्याची समस्या निर्माण झाली असून सर्व वाहने वाहनधारक संगोळ्ळी रायण्णा रोड शेजारीच पार्क करीत आहेत. परिणामी संगोळ्ळी रायण्णा रोडला वाहनतळाचे स्वरुप आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालला असून दररोज कोरानाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एक जूनपासून न्यायालयीन कामकाज सुरू झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पण न्यायालय आवारात सामाजिक अंतर राखले जात नसल्याने वाहने पार्क करण्यास व कामाविना न्यायालयात येणाऱया नागरिकांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या न्यायालयीन कामकाज नियमितपणे सुरू नसले तरी महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वकीलवर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि नागरिक न्यायालयात येत आहेत. पण न्यायालय आवारात वाहने पार्क करण्यास बंदी घालण्यात आल्याने वाहने पार्क करण्याची समस्या निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच वाहनधारकांची अडवणूक होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आणि संगोळ्ळी रायण्णा रोडवर दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. न्यायालयापासून मराठा मंडळ शाळेपर्यंत संगोळ्ळी रायण्णा रोडवर दोन्ही बाजूने चार चाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत. संगोळ्ळी रायण्णा रोडला आता वाहनतळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनधारकांना वाहने पार्क करण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे न्यायालय आवारात वकिलांना वाहने पार्क करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे. ही समस्या कधी संपुष्टात येणार याकडे वकील मंडळी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.