ऑनलाईन टीम / मुंबई :
गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून अख्तर यांच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेनेही या वादात उडी घेतली असून, सामना या मुखपत्रातून अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.
हिंदू राष्ट्र संकल्पना मांडणारे आणि त्याला पाठिंबा देणारे लोक तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेना अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे चुकीचेच आहे, असे मत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडले आहे.
दरम्यान, तालिबान हे जंगली असून, त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात जे लोक आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे समर्थन करतात, ते देखील तालिबानसारखेच आहेत. कारण ज्या पद्धतीने तालिबानी मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. त्यामुळे अशा लोकांनी आत्मपरिक्षण करावे, असे परखड मत अख्तर यांनी मांडले होते.