विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घरी बसूनच अध्यापन : जिल्हय़ात संकल्पना राबवणार
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना विषाणू साथीच्या रोग प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय क्रीडा विभागाने घेतला आहे. ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱयांनी काढण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हय़ातही पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविली जाणार आहे.
कोरोनाचे संकट देशात आल्यानंतर गेला दीड महिना सर्व शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे वर्षभरातील अस्थापन मूल्यमापनावर नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु, कोरोनाच्या फैलावमुळे संचारबंदीमध्ये वाढ होत असल्याने या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
घर हेच एक प्रयोगशाळा
सध्या देशभरामध्ये संचारबंदीची परिस्थिती आहे. जगभरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अशा गंभीर परिस्थितीत वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्यामुळे, कारखाने बंद असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणाप्रती अधिक सजग करता येऊ शकते. संचारबंदीच्या काळामध्ये पालक, मुले, सर्व कुटुंबीय घरातच बंदिस्त झाले आहेत. अशा काळात घर हेच एक प्रयोगशाळा बनवता येऊ शकेल का? घरातील वेगवेगळे साहित्य, स्वयंपाक घरातील वस्तू, त्यांची रचना, कार्य तसेच या वस्तूंच्या मागचे विज्ञान याबाबत मुलामंध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी शासनाने पाऊले उचलली आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर करणार
संचारबंदीच्या या काळात मुलांच्या मनामध्ये असलेली भीती, चिंता दूर करण्याचा प्रयत्नही करणे आवश्यक आहे. हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करून काही नव्या गोष्टी करता येऊ शकतात. यासाठी तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन शिक्षण पद्दतीचा अवलंब करणे आता उपयुक्त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना आता स्वयंअध्ययन करता येईल. सद्य:स्थितीत शालेय अभ्यासक्रमातील मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरिक शास्त्र, भूगोल, कला, कार्यानुभव, आरोग्य, शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासाची आता नवीन दिशा ठरविता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकेल.
शिक्षण अधिक समृद्ध, सखोल करणार
मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी सध्या खूप वाव आहे. पालकांना मुलांचा कल, छंद, वृत्ती, दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला काही मदत करता येऊ शकेल का? त्यासाठी प्रश्नावली त्यांना पुरवता येऊ शकेल का? याचाही विचार करता येऊ शकतो. सध्या शालेय अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापनाचे कार्य बंद असले, तरी मुलांचे अध्ययन मात्र बंद नाही. ते सतत सुरू असते. पण अभ्यासापलीकडच्या या अध्ययनाला शालेय अभ्यासाची जोड देता आली, तर शिक्षण हे अधिक समृद्ध, सखोल आणि समजपूर्वक करता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकेल का? त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय संस्कृतीतील अभिवादनाची पद्धती जगभरामध्ये वापरली जात आहे. या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीला जगामध्ये एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीचा वारसा मुलांना समजावून सांगून त्याचे महत्त्व पटवून देण्याची ही योग्य वेळ आहे, हे लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांना घरी राहून शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लर्निंग फ्रॉम होम संकल्पना
महाराष्ट्र शासनाने या पूर्वीपासूनच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. त्या सर्व पालकांपर्यंत आणि मुलांपर्यंत पोहोचून आपले शिक्षण आपण या काळात सुद्धा सुरू ठेवू शकतो. त्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक एप्लिकेशन्स यांचा वापर शिक्षक, पालक आणि विद्यार्थांनी करावा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सेक्युरिटी संदर्भातही विद्यार्थी आणि पालक यांचे सतत उद्बोधन होणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी काही महत्वाच्या संसाधनांची माहिती शासन सर्वांना करून देत आहे. त्यांचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता आहे. या करिता घरी राहून शिक्षण (Learning From Home) ही संकल्पना राबविण्यासाठी विविध संसाधनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी, अशा सूचना सर्व जिल्हय़ाच्या शिक्षण अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत.
DIKSHA ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू
DIKSHA वर सद्यस्थितीमध्ये पहिली ते दहावीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दु भाषेमधील 9000 पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. उपलब्ध ई-साहित्यामध्ये प्रामुख्याने इंटरॅक्टिव व्हीडिओ, संकल्पनेवर आधारित व्हीडिओ, उपक्रमावर आधारित व्हीडिओ, बौद्धिक खेळ स्वरुपातील गेम्स, विविध वर्कशिट, इंटरॅक्टिव प्रश्नपेढी इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील DISKHA वरील ई-साहित्याची निर्मिती केली आहे. DISKHA वरील उपलब्ध ई-साहित्याचा वापर करून विद्यार्थी घरबसल्या आपले अध्ययन सुरू ठेवू शकतात तसेच पालक याचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकतात.
पहिली ते दहावीसाठीचे DIKSHA मोबाईल ऍप
पहिली ते दहावीच्या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पाठय़पुस्तकामध्ये Q. R. Code देण्यात आले आहेत. या क्यू. आर. कोडला शिक्षकांमार्फत तयार करण्यात आलेले ई-लर्निंग साहित्य जोडलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही स्वयं अध्ययनावर आधारित उपक्रमांचा समावेश देखील करण्यात आला आहे. हे सर्व साहित्य पाठय़पुस्तकातील क्यू. आर. कोड दिक्षा ऍप वापरून स्कॅन केल्यावर सहज पाहता येणार आहे. तसेच पाठय़पुस्तक नसल्यास सर्व साहित्य दिक्षा ऍपमध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून देखील पाहता येणार आहे. हे साहित्य ऑफलाईन वापरण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
पहिली ते दहावीसाठीचे दिक्षा वेब पोर्टल
संगणक लॅपटॉपवरदेखील दिक्षा ऍपमधील ई-साहित्य पाहण्यासाठी दिक्षा वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यात पहिली ते दहावीच्या सर्व विषयांचे ई-साहित्य पाहता येते.
क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्न
इयत्ता आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, गणित आणि विज्ञान साक्षरतेवरील सीसीटी आठवडय़ातून दिक्षा ऍपवर अपलोड केल्या जातात. सीसीटी सरावासाठी नवीन प्रश्न दर सोमवारी अपलोड केले जातात. गुरुवारी उत्तरे दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार कौशल्य निर्माण करण्याची चांगली संधी उपलब्ध होते. हे प्रश्न बघण्यासाठी यूआरएल चा वापर करावा. सीसीटीमार्फत सदर उपक्रम इतर इयत्तांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ऑनलाईन पाठय़पुस्तके
पहिली ते बारावी साठीची सर्व पाठय़पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी बालभारती वेबसाईट (www.ebalbharati.in) संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ BOOKS DOWNLOADING मधून पहिली ते दहावीच्या राज्य अभ्यासक्रमावरील एकूण दहा भाषा माध्यमातील पाठय़पुस्तके पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.