प्रतिनिधी/ गुहागर
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी असतानाही त्याचा भंग करत विवाह सोहळय़ाचे आयोजन केल्याप्रकरणी दोन्ही यजमानांसह चौघांविरोधात गुहागर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील भातगाव-कोसबीवाडी येथे हा विवाह सोहळा पार पाडला.
भातगाव-कोसबीवाडी येथे शुक्रवारी हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळय़ाला 100 ते 150 लोक हजर होते. गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम सहकाऱयांसह विवाहस्थळी दाखल झाले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही त्याचा भंग केल्याने काजुर्ली येथील भटजी संजय जोशी, वधु पिता प्रकाश धोंडू हारेकर, भातगावचे पोलीस पाटील सिद्धोधन गणपत मोहिते, वर पिता अनंत पांडुरंग वेले यांच्यावर भा.दं.वि.सं. कलम 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3)/135, साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.