प्रतिनिधी/ सातारा
पालिकेच्या इतिहासात प्रथमच 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेवून पैसे खिशात ठेवताना रंगेहात पकडलेल्या उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्यासह इतर दोन संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दाखल असलेल्या गुह्यातील आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या वर्षभरात त्या कंपनीस सातत्याने त्रास दिला जात होता. कंपनी व्यवस्थापनाकडून अनेकदा विनंती करुनही पैशाची मागणी काही कमी होत नव्हती. शेवटचे बिल व अनामत रक्कम असे मिळून 15 लाख रुपयांची रक्कम पालिकेकडून येणे बाकी होते. तर पालिकेकडून गुणवत्ता प्रमाणपत्र तयार असूनही ते दिले जात नव्हते. पैशांची मागणी थांबता थांबत नव्हती. अखेर संबंधित ठेकेदाराने या त्रासाला कंटाळून लाचलुचपकडे तक्रार दिली. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ हे कोरोनाच्या कामानिमित्ताने प्रांत कार्यालयात गेले होते. तेथून काम आटोपून पालिकेत आले अन् त्यांच्या केबीनमध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 2 हजारांची बंडले असलेले 2 लाख 30 हजार रुपयांची रक्कम न मोजता तशीच घेवून खिशात टाकली. पालिकेतून ते बाहेर पडले अन् तवेरा गाडीत बसत असताना त्यांना लाचलुचपतच्या पथकाच्या कर्मचाऱयांनी पकडले. त्यावेळी काही कर्मचाऱयांनी साध्या वेशात असलेल्या पोलिसांना अटकाव केला होता. मात्र, पोलिसांनी आपण पोलीस आहोत असे सांगताच अटकाव करणारे कर्मचाऱयांनी लगेच काढता पाय घेतला. तत्पूर्वी पैसे कोणी घ्यायचे यावरुन चांगलीच फोनाफोनी झाली होती. दोन्ही आरोग्य निरीक्षक टोपे आणि यादव यांनी आमच्याकडे पैसे द्या, वरुन पंधरा हजार द्या तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल, असे तक्रारदारांकडे पालिकेच्या बाहेर तकदा लावला होता. परंतु तक्रारदारांनी धुमाळ साहेबांकडे पैसे देणार आहे. ते येत आहेत, त्यांच्याशी फोन झाला आहे, असे सांगताच त्या दोघांनीही तेथेच थांबले. अन् संचित धुमाळ आले तेव्हा त्यांच्याकडे पैसे देण्यात आले. शहर पोलिसात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार तिघांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौथा संशयित आरोपी राजेंद्र कायगुडे यांच्या शोधात पोलीस आहेत.
त्या क्लिपांचीही होणार तपासणी
संबंधित तक्रारदारांनी अधिकाऱयांशी केलेली फोनवरुन बातचित, पैसे घेतल्यानंतर कसे वाटप होते याची माहिती देणारे ते पालिकेचे कर्मचाऱयांचे चित्रीकरण असल्याने त्या चित्रीकरणाचीही तपासणी करण्यात येणार आहे. असे लाचलुचपत विभागाने सांगितले. त्यामुळे पालिकेत धाबे दणाणले आहेत.