वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षनेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. संजदचे नवे अध्यक्ष म्हणून ललन सिंग यांची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे शनिवारी पार पडलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ललन सिंग हे बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे अत्यंत घनिष्ठ सहकारी मानले जातात.
या बैठकीत सामील होण्यासाठी नितिश कुमार पाटण्याहून दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्या उपस्थितीतच केंद्रीयमंत्री आरसीपी सिंग यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्ष नेत्यांदरम्यान ललन सिंग यांना पक्षाचा अध्यक्ष करण्यासंबंधी सहमती झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे सर्व खासदार आणि अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष देखील सामील झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला तेव्हा संजदच्या कोटय़ातून आरसीपी सिंग यांना मंत्रिपद देण्यात आले होते. आरसीपी सिंग केंद्रीय मंत्री झाल्याने ललन सिंग नाराज असल्याची चर्चा होती.
ललन सिंग हे नितिश कुमार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. याचमुळे त्यांची या पदाकरता निवड झाली असण्याची शक्यता आहे. ललन सिंग यांचे मूळ नाव राजीव रंजन सिंग असून ते मुंगेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. संजदच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे ललन सिंग यांनी जयप्रकाश नाराण यांच्या आंदोलनातही भाग घेतला होता.