ऑनलाईन टीम / मुंबई :
चित्रपट अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर कर्करोगाविरोधात लढाई जिंकल्याची घोषणा केली. तुम्हा सर्वांना ही आंनदाची बातमी सांगताना माझे मन कृतज्ञतेने भरून गेलेय. मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचे संजय दत्तने म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये संजय दत्तला ॲडवान्स स्टेजचा फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर संजय दत्त अनेकवेळा मुंबईच्या लीलावती आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी येत जात होता.
संजय म्हणाला, मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. परंतु ते म्हणतात ना देव जास्त संकटं ही सर्वात शक्तिशाली लोकांच्याच वाट्याला देतो. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीचं मी या लढाईतून विजयी झाल्याने मला आनंद झाला आहे. हे तुमच्या समर्थनाशिवाय शक्य झाले नसते. संकट काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेले माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचा मनापासून आभारी आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार.
पुढे तो म्हणाला, खासकरुन कोकिलाबेन रुग्णालयातील डॉ. सेवंती आणि तिच्या टीमचे मनापासून मी आभार मानतो. ज्यांनी माझी खूप काळजी घेत मला यातून बाहेर काढले. सर्वांचे धन्यवाद!