ऑनलाईन टीम / कोलकाता :
शिवसेना नेते संजय राऊत यांना सोशल नेटवर्कच्या साईटवर धमकी देणाऱ्या एका व्यक्तीस शुक्रवारी कोलकाता मधून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव पलाश घोष असे आहे. त्याने दावा केला आहे की, तो कंगनाचा समर्थक आहे.
मुंबई पोलिसांच्या एका टीमने कोलकाता पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी पहाटे दक्षिण कोलकाता येथील टॉलिगंज भागातून त्याला अटक केली आहे.
घोष याने सोशल नेटवर्किंग साईटवर शिवसेना नेते संजय राऊत यांना गंभीर परिणाम भोगण्याची तयारी ठेवा अशा आशयाची धमकी दिली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोलकाता पोलिसांची मदत घेत घोष याला अटक केली आहे.
पलाश याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याचा ट्रान्झिट रिमांड घेऊन मुंबईत आणले जाणार आहे.