सांस्कृतिकप्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी गेले वर्षभर आघाडीवर सेवा देत आहेत. या आणिबाणीच्या काळात सामाजिक बांधलकीचा भाग म्हणून बांदोडा येथील संजीवन संस्थेच्या होमनर्स म्हणजेच परिचारिकांनीही आपला छोटासा वाटा उचललेला आहे. या परिचारिका फोंडय़ातील ‘दिलासा’ तसेच सावईकर इस्पितळात सेवापूर्व प्रशिक्षणाचा भाग म्हणून कोरोना रुग्णांना सेवा देत आलेल्या आहेत.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णांना नियमित औषधे देणे, तसेच ऑक्सीजन पातळी राखण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन करणे ही कामे करतानच, फुफ्फुसामध्ये श्वसन प्रक्रिया निट राहावी यासाठी प्राणायामचे प्रशिक्षण रुग्णांना त्यांच्याकडून मिळत आहे. संजीवनमधून तयार झालेल्या अनेक परिचारिका कोरोना महामारीच्या काळात घरांमध्ये विलगीकरणात असलेल्या रुग्णांनाही सेवा देत असून बऱयाच परिचारिका गोव्यातील विविध इस्पितळांमध्ये तर काही परदेशात कार्यरत आहेत, अशी माहिती संजीवन होमनर्सिंगच्या प्रमुख ममता बदामी यांनी दिली.
समाजातील दुबळ घटकांचा विकास तसेच युवा पिढीला आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने समाजसेविका डॉ. आशाताई सावर्डेकर यांच्या पुढाकाराने 8 जानेवारी 1978 या दिवशी संजीवनची स्थापना झाली. गरजू लोकांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना आत्मनिर्भर कसे बनविता येईल? हा दृष्टीकोन डोळय़ांसमोर ठेऊन आरोग्यधाम, नंदादीप या उपक्रमातंर्गत काम करणाऱया मुली व महिलांसाठी वसतिगृह, गृहपारिचारीका अभ्यासक्रम, सरकारमान्य व्यावसायिक उपक्रमांतर्गत उच्च माध्यमिक विद्यालय आदी सुविधा राबविण्यात येत आहेत. नागेशी येथे स्वतःच्या प्रशस्त अशा वास्तूमध्ये संजीवनचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. गोवा सरकार, केंद्रीय मानव विकास संसाधन तसेच देश विदेशातील दात्यांकडून संस्थेला मदतीचा हात लाभत आहे.
गृह परिचारिका म्हणजेच होम नर्सिंग अभ्यासक्रमाची जबाबदारी ममता बदामी या पाहत आहेत. युवा विकास कार्याचा एक भाग म्हणून युवकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उदात्त हेतूने हा अभ्यासक्रम सन 2000 सालापासून सुरु करण्यात आला. आठवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘होम नर्सिंग’ मधील एका वर्षाचा, तर दहावीपर्यत शिक्षण घेतलेल्यांना दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. अभ्यासक्रमाच्या दरम्यान पारिचारिकांना अनुभवी डॉक्टर्स, आयुर्वेद क्षेत्रातील तज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. याशिवाय विविध इस्पितळांच्या माध्यमातून इंटर्नशिप व सेवानुभवाची सोयही आहे. आजपर्यंत अनेक युवतींनी होम नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण करून देश विदेशात त्या सेवा देत आहेत.
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आशा सावर्डेकर, प्राचार्य अवधूत कामत तसेच अन्य पदाधिकारी आणि दात्यांची मदत व मार्गदर्शन या कार्याला लाभत आहे, असे बदामी यांनी सांगितले. संजीवनतर्फे ज्येष्ठ नागरिक तसेच गरजूंच्या निवाऱयाची, आरोग्याची आणि दैनंदिन सेवेची व्यवस्था करण्याची सोय आहे.