राजदमध्ये कौटुंबिक कलह – छात्र जनशक्ती परिषदेची स्थापना
वृत्तसंस्था/ पाटणा
लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव सध्या स्वतःच्या पक्षावर म्हणजेच राष्ट्रीय जनता दलावरच नाराज आहेत. छोटे बंधू तेजस्वी यांच्याशी त्यांचे पटेनासे झाले आहे. सोशल मीडियावर तेजप्रताप सातत्याने तेजस्वी यांना लक्ष्य करत आहेत. तेजप्रताप यांनी आता छात्र जनशक्ती परिषदेची स्थापना करत स्वतःला याचा अध्यक्षही घोषित केले आहे.
छात्र राजदच्या प्रदेशाध्यक्षाला हटवून नवा अध्यक्ष नियुक्त करणे आणि राजद प्रदेशाध्यक्षावर कारवाई न झाल्याने तेजप्रताप अधिकच भडकले आहेत. छात्र जनशक्ती परिषदेच्या माध्यमातून मी नव्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. हे आंदोलन बिहारसमवेत अन्य राज्यांमध्येही होणार असल्याचा दावा तेजप्रताप यांनी केला आहे.
तेजप्रताप यांनी तरुणाईला या संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे नवे फेसबुक आणि ट्विटर पेजही तयार केले जाणार आहे. सदस्यत्वाचा अर्ज तयार केला जाणार असून विद्यापीठांमध्ये शिबिरांचे आयोजन होणार आहे.
छात्र जनशक्ती परिषद शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारीचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित करणार आहे. ही संघटना राजदचा भाग असणार आहे. राजदला मजबूत करणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला आहे.