नवी दिल्ली : माजी दिवंगत अध्यक्ष अरुण जेटली यांचा फिरोजशाह कोटला स्टेडियमवर पुतळा उभारण्याच्या प्रस्तावामुळे संतप्त झालेले माजी महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी डीडीसीए सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला, तसेच स्टेडियममधील एका स्टँडला देण्यात आलेले आपले नावही रद्द करावे, अशी सूचना केली. जेटली यांचा राजकीय पिंड होता. त्यामुळे, कोटला स्टेडियमऐवजी संसद प्रांगणात त्यांचा पुतळा उभारणे अधिक उचित ठरेल, असे ते म्हणाले. डीडीसीएचे विद्यमान अध्यक्ष, अरुण जेटली यांचे चिरंजीव रोहन जेटली यांच्या नावे बेदी यांनी पत्र पाठवले असून त्यात या प्रस्तावाला आपला कडाडून विरोध नोंदवला आहे.
‘आजवर मी बराच संयम ठेवला. शिवाय बरेच काही सहन केले. पण, आता कदाचित माझी सहनशीलता संपलेली आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेने माझी बरीच परीक्षा घेतली आहे आणि आता या निर्णयाप्रत येणे भाग पाडले आहे. त्यामुळे, प्रेक्षकांच्या एका स्टॅण्डला देण्यात आलेले माझे नाव काढले जावे, अशी मी आपल्याला विनंती करत आहे. याशिवाय, मी माझ्या सदस्यत्वाचाही येथे राजीनामा देत आहे’, असे बेदी यांनी आपल्या पत्रात नमूद केले. दरम्यान, बेदींच्या या पत्रावर दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
अरुण जेटली 1999 ते 2013 या 14 वर्षांच्या कालावधीत दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सहा फुटी पुतळा उभारण्याचा संघटनेचा प्रस्ताव आहे. त्याला बेदी यांनी तीव्र विरोध दर्शवला. अरुण जेटली यांची कार्यपद्धत आक्षेपार्ह असेल तर त्याला मी नेहमीच कडाडून विरोध केला. त्यांनी ज्या लोकांना संघटनेवर निवडून आणले, त्यालाही माझा विरोध होता. एकदा मी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतून अर्ध्यावरच निघून येणे पसंत केले होते, असे बेदी याप्रसंगी म्हणाले.