प्रतिनिधी /बेळगाव
संतिबस्तवाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गाय, म्हैस, घोडा, कुत्रे, मांजर अशा 300 हून अधिक पाळीव जनावरांची तपासणी करण्यात आली. जनावरांना उन्हाळय़ात विविध आजारांची लागण होते. या पार्श्वभूमीवर खात्यामार्फत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जनावरांची गर्भधारणा, जंत व इतर आजारांची तपासणी करण्यात आली. काही जनावरांना जंत आणि इतर आजार असतात. मात्र पशुपालक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक फटका बसतो. याकरिता पशुसंगोपन खात्यामार्फत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून जनावरांची तपासणी केली जात आहे. यावेळी पशुपालकांना जंतनाशक औषधांचे वितरण करण्यात आले आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याचेही मार्गदर्शन करण्यात आले.