वार्ताहर / मडकई
लॉकडाऊनच्या काळात फोंडा परिसरात वास्तव्यास असलेल्या हजेरी पटावरील परप्रांतीय मजुरांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती उद्योजक तथा माजी पोलीस अधिकारी संतोबा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मजुरांना आत्तापर्यंत एकूण 36 हजार जेवणाच्या थाळय़ांचे वितरण केले असून लॉकडाऊन संपेपर्यत अंदाजे 45 हजारांच्या आसपास जेवणाच्या थाळय़ा वितरीत कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. संतोबा देसाई गुप आणि पिपल ऑफ फोंडा यांच्या सहकार्यांने हे मदतकार्य सुरु आहे.
यावेळी पिपल ऑफ फोंडाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र देव, माणीकराव देसाई, पदाधीकारी संजय देसाई, सतीश भट, प्रमोद सावंत, विपीन सिरसाट, निलेश नाईक, सुदेश नार्वेकर, नरेश नाईक आदी उपस्थीत होते. सुरूवातीला 30 मजूरांसाठी प्रत्येकी दोनशे रुपये वितरीत करण्यात आले. हे पैसे दारूवर उडवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पैसे देणे बंद करून 300 जेवणाची पाकिटे तयार करून वितरीत करण्यात आली. मजूरांची संख्या वाढत असल्याने, तसेच जेवण बनविण्यासाठी मदत करणारे कामगार घरी गेल्याने मजूरांच्या जेवणाची सोय करणे अडचणीचे होऊ लागले. त्यामुळे पिपल ऑफ फोंडा या संस्थेच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी सांगितले. संतोबा देसाई यांच्या जागेतच एकूण 1500 जेवणाच्या थाळय़ा बनवून शापूर, वरचा बाजार येथील कामगारांना त्या वितरीत केल्या जातात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदार संघातील 104 कुटुंबांना अशाच प्रकारे केलेली मदत पाहून त्यांनी या उपक्रमास सरकारतर्फे मदत केली आहे. फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी केदार नाईक, मामलेतदार कौशीक देसाई यांनी या आठ दिवसापासून तांदूळ व डाळ देण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत त्यांच्याकडून एकूण 890 किलो तांदूळ तर 240 किलो डाळ मिळाली आहे. या पूर्वीचा सर्व खर्च आपल्या ट्रस्टमधून केला गेला. आपल्या गावात कुणीही मृत्यू पावल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य मोफत पुरविले जाते. तसेच पीओपीच्या माध्यमातून फोंडयातही हा उपप्रम सुरू केला जाईल अशी माहीती श्री. देसाई यांनी दिली. यावेळी पीओपीचे अध्यक्ष डॉ. देव यांनी संस्थेच्या पदाधिकाऱयांच्या कार्याचे कौतूक केले. याशिवाय सुदेश नार्वेकर व नरेश नाईक यांच्याकडून खास सहकार्य लाभत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
दरम्यान संतोबा देसाई यांनी लॉकडाऊनच्या काळात फोंडा पोलीस स्थानकातील सर्व पोलिसांना मोफत जेवण पुरविण्याची सोय केली आहे. त्यासंबंधीचे सोपस्कर दक्षीण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्याशी बोलून पूर्ण केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.