पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव महाविद्यालय; भारत सरकारकडून सन्मानित
महागाव : प्रतिनिधी
येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकमध्ये राबवण्यात आलेल्या केंद्रीय मानव संसाधन विकास, केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे परीक्षण करून भारत सरकारने ‘थ्री स्टार रुटिंग’ देऊन सन्मानित केला.
अशा प्रकारचे रेटिंग महाराष्ट्रातील दोनच महाविद्यालयांना प्राप्त झाला असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव संत गजानन पॉलिटेक्निकला हा बहुमान प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य संजय दाभोळे यांनी दिली. केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया, व्होकल फोर लोकल, मेक इन इंडिया या प्रकल्प अंतर्गत नवीन संशोधन व संकल्पनांना चालना मिळावी. या उद्देशाने दरवर्षी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी बद्दल देशभरातील विविध संस्थाना रेटिंग देऊन गौरवण्यात येतो. यावर्षी महाराष्ट्रातून दोनच संस्थाची निवड झाली. त्यापैकी येथील पॉलिटेक्निकला चार पैकी तीन रेटिंग प्राप्त झाले.
या यशामध्ये प्राचार्य दाभोळे, प्रा. रोहिणी पाटील, प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. संतोष गुरव, प्रा. अब्दुल मुल्ला याबरोबरच आयआयसीचे सर्व टीम, आजी व माजी विद्यार्थी, व्यवस्थापक, शिक्षकांचे योगदान मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थाध्यक्ष ऍड .आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, सचिव ऍड. बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.