प्रतिनिधी / बेळगाव
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वा. पु. गिंडे (वय 85) यांचे सोमवारी पहाटे बाजार गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. वा. पु. गिंडे यांनी एम. ए. नंतर ‘शेक्सपिअरचा मराठी नाटकांवर परिणाम’ या विषयावर पीएच. डी. केली. एमफील व पीएच.डी.चे मार्गदर्शक व तसेच विविध विद्यापीठांचे पदव्युत्तर प्रबंधाचे परीक्षक म्हणूनही त्यांचे काम महत्त्वाचे होते. नागपूर विद्यापीठात त्यांनी अतिथी प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले. पुणे येथे झालेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत ‘अमृतानुभवाचे तत्वज्ञान’ यावर निबंध वाचन केले होते. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयात चर्चासत्रात त्यांचा सहभाग असायचा. अनेक शोधनिबंध त्यांनी सादर केले.
‘कल्लोळ अमृताचे’, ‘बालकवींची कविता ः आकलन आणि आस्वाद,’ ज्ञानेश्वरीतील ‘एक रसतीर्थ’, ‘रुक्मिणी स्वयंवर ः नाथांचे व इतरांचे’,‘ स्फटिक गृहीचे दीप’,‘हरिपाठ चिंतन’, ‘वर्षे अमृताचा धनु,’ ‘साहित्य ः आस्वाद’, ‘अध्यापन आणि समीक्षा’, ‘ज्ञानेश्वरी अध्याय 1, 2, 9 व 7’, ‘चांगदेव पासष्टी’ ही त्यांची साहित्य संपदा आहे.
संत साहित्य योगदानाबद्दल त्यांना श्रीमद् शंकराचार्य जयजयेंद्रस्वामी, कांचीकामकोटी पीठ यांच्यातर्फे गौरवपत्र देण्यात आले होते. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानदेव अध्यासनाचा सर्वेत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार त्यांना लाभला. महाराष्ट्र साहित्य परिषद, गीता धर्म मंडळ पुणे, नामदेव अध्यासन पुणे विद्यापीठ, पार्वती प्रति÷ान नाशिक अशा अनेक संस्थांतर्फे त्यांना गौरविण्यात आले होते. सारस्वत समाजाचे स्वामी शिवानंद सरस्वतीजी कवळेमठ यांच्या हस्ते संत साहित्याचे उपासक म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कै. वेदमूर्ती श्रीकृष्ण वामन देव आणि ऋग्वेद धनपाठी डॉ. विश्वनाथ वामन देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना सन्मानपत्र देण्यात आले होते. त्यांच्या निधनाने बेळगावातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.