पक्षाविरोधात लढण्याचा ठाम निर्णय
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा मतदारसंघात भाजपाची उमेदवारी रवी नाईक यांना दिल्याने भाजपाचे पदाधिकारी संदीप खांडेपारकर यांनी त्यांच्या विरोधात अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा हा तत्वनिष्ठ पक्ष राहिलेला नसून प्रामाणिक कार्यकर्त्यांची त्याला कदर राहिलेली नाही. केवळ फोंडय़ातच नव्हे तर दहा ते बारा मतदारसंघामध्ये भाजपाने आपल्या मूळ कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून आयात उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचा हा निर्णय आत्मघातकी असून त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येणार आहेत,, अशी टिका खांडेपारकर यांनी केली आहे.
फोंडय़ात भाजपाने ज्या नेत्याला उमेदवारी दिली आहे, त्यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपाचा विश्वासघात करुन ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला तोंडघशी पाडल्याचा इतिहास जनता विसरलेली नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व अनेक पक्षामध्ये फिरुन आलेल्या उमेदवारांना सन्मानाने तिकीट देण्याचे भाजपाचे हे धोरण पक्षाच्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणारे आहे. भाजपा कार्यकर्ता म्हणून गेली 22 वर्षे आपण पक्षासाठी एकनिष्ठपणे कार्य केले. दोन निवडणुकांमध्ये उमेदवारीवर पाणी सोडून तडजोड केली. यावेळी आपल्याला उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र आपला हा अधिकार नाकारला गेला आहे. त्यामुळे आपण पक्षाच्या विरोधात स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवतावाद’ या तत्वाच्या पायावर पक्षाची उभारणी झाली. मात्र आज हा पक्ष सत्तेसाठी लाचार व आगतिक बनलेला आहे. फोंडय़ातील जनता सुशिक्षीत व सुजाण आहे. भाजपचा हा निर्लज्जपणा प्रामाणिक मतदार कदापी खपवून घेणार नाहीत. पक्षाच्या तत्वांशी निष्ठा असलेले कार्यकर्ते व सुजाण मतदार आपल्या पाठीशी असून भाजपच्या या भ्रष्ट व नितीहीन राजकारणाला धडा शिकविण्यसाठी ते निश्चितच आपल्याला निवडून देतील असा दावाही संदीप खांडेपारकर यांनी केला आहे.