पर्ये/ वार्ताहर
समाजात अनेक माणसे हलाखीचे जीवन जगतात. अशीच एक सुमारे 65 वर्षांची व्यक्ती कोल्हापूर चंदगड येथून गोव्यात पोचली होती. म्हापसा येथे भीक मागून जीवन जगत होती. या व्यक्तीला देवदूत म्हणून सापडले कुडाळच्या संविता आश्रमचे संदीप परब. परब यांच्यामुळे कुटुंबापासून हरवलेली एक व्यक्ती पुन्हा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचली, अन सर्वांनाच आनंद झाला.
निराधार, मनोरुग्ण यांच्या सेवेसाठी आश्रम चालवणारे कुडाळ- पणदूर येथील संविता आश्रमचे प्रमुख संदीप परब काही दिवसांपूर्वी म्हापसा येथील जी. एस. आमोणकर माध्यमिक विद्यालय व श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयात एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमात चर्चेच्यावेळी म्हापसा बसस्थानकावर असलेल्या अनेक निराधार – मानसिक रुग्णांचा विषय निघाला. परब यांना माहिती कळल्यावर त्यांनी त्या रात्री 10 च्या सुमारास म्हापसा बसस्थानक गाठले. पाहतो तर 30-35 निराधार व्यक्ती बसस्थानकावर झोपलेल्या अवस्थेत. परब ती रात्रभर त्या सर्व निराधारांशी बोलले. कुठून आलात, इथे काय करतात,पोट कसे कसे भारतात बोलून ते कुठून आले, काय करतात, पोट कसे भरतात व त्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. त्यांना खायला प्यायला दिले.
या मंडळीपैकी त्यांना एक मानसिक रुग्ण आढळला. मळलेले फाडके कपडे, सैरभैर विंचलेले केस, अंगावर घाण त्यांनी त्याची सर्व चौकशी केल्यावर तो चंदगड तालुक्मयातील सैन्य दलातील निवृत्त सैनिक असल्याचे समजले. त्याच्या घरी बायको मुले असा परिवार आहे. पण आपले मानसिक संतुलन बिघडल्याने आपण घरातून बाहेर पडलो तो भटकत भटकत येथे पोहचलो. आता आपल्याला घरी जायला समजत नाही. असे त्यांनी संदीप परब यांना सांगितले.
त्यानंतर परब यांनी ती रात्रभर त्या रुग्णासहित बस स्थानकावर घालवली. सकाळी उठल्या उठल्या त्या रुग्णाला सार्वजनिक आंघोळ गृहात नेऊन आंघोळ घातली, त्याचे केस- दाढी कापली व त्याला व्यवस्थित कपडे घातले. त्यांना आश्रमचे प्रसाद आंगणे व आशिष कांबळे यांनी मदत केली.
यादरम्यान परब यांनी आपल्या संविता आश्रमातील रुग्णवाहिका बोलावून घेतली. आणि म्हापसातील सामाजिक कार्यकर्ते संदेश बुर्ये, विजय भिके, पूनम बुर्ये यांच्या मदतीने म्हापसा पोलीस स्थानकात यासंबंधीची माहिती दिली. त्यांना पोचवण्याची परवानगी घेतली. त्यानंतर संविता आश्रमचे उदय कामत, सुनील परब या कार्यकर्त्यांनी त्या रुग्णाला चंदगड पोलिस स्थानकात नेऊन पोचवले. चंदगड पोलिस स्थानकात सदर व्यक्ती बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली होती. त्यानंतर लगेच चंदगड पोलिसांनी सदर व्यक्तीच्या कुटुंबाला बोलावून घेतले व याची भेट करून दिली. संदीप परबच्या प्रयत्नाने एक मनोरुग्ण आपल्या घरी पोचू शकली.
निराधार- मानसिक रुग्णासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रमाचे प्रमुख संदीप परब गेल्या अनेक वर्षांपासून अशा रुग्णासाठी पणदूर येथे आश्रम चालवतात. मुंबईतही त्यांचे दोन आश्रम आहे. पणदूरला 120 पेक्षा जास्त मानसिकरुग्ण व निराधार व्यक्ती आहेत तर मुंबईत ही मुंबई परिसरात असे अनेक रुग्ण आहेत. कुडाळ तील संदीप परब यांच्या मानवतावादी कार्याने एक घरापासून भटकलेल्या माणूस सुखरुप घरी पोहचला व आपल्या लोकांची पुनरभेट पुन्हा घेऊ शकला.