कणकवली येथे मान्यवरांकडून कौतूक : संदेश पारकर वाढदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर : राजकीय जीवनात नेहमी संघर्षाला सामोरे जावे लागणारे नेतृत्व!
150 जणांकडून रक्तदान
कणकवली:
खऱया अर्थाने संकटाला भक्कमपणे, निधडय़ा छातीने तोंड देणारा कार्यकर्ता म्हणजे संदेश पारकर. राजकीय जीवनात त्यांना नेहमीच संघर्षाला सामोरे जावे लागले. मात्र, न डगमगता कणकवली व जिल्हय़ाच्या विकासासाठी त्यांनी आपली वाटचाल अगदी सक्रियपणे सुरू ठेवली आहे. साहजिकच या लढवय्या नेत्याचे भवितव्यही उज्ज्वलच आहे. आम्ही सर्वजण नेहमीच त्यांच्या सोबत राहू, अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी पारकर यांना दिल्या.
शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारकर यांच्यासह आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, नीलम सावंत-पालव, अवधूत मालणकर, दादा भोगले, डॉ. अभिनंदन मालंडकर, राष्ट्रवादी पदाधिकारी प्रफुल्ल सुद्रिक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर आदींसह विविध राजकीय पदाधिकारी, राजू शेटये, विलास गुडेकर, कार्यकर्ते व पारकरप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पारकरांचे भवितव्य उज्ज्वल!
वैभव नाईक म्हणाले, पारकर यांचा वाढदिवस आपण कणकवलीवासीय दरवर्षी उत्साहात साजरा करत असतो. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे होणारे कार्यक्रम रद्द करावे लागले. तरीही मानवी जीवनातील महत्वपूर्ण दान समजले जाणारे रक्तदान शिबीर आयोजित करून हा वाढदिवस आपण आगळय़ा-वेगळय़ा सामाजिक पद्धतीने साजरा करत आहोत. आतापर्यंत दोन वर्षे सोडली, तर पारकर यांच्या वाढदिवसाला मी नेहमीच उपस्थित राहिलोय. आतापर्यंत आम्ही वेगवेगळय़ा पक्षात होतो. पण, आज पहिल्यांदाच आम्ही दोघेही एका पक्षात कार्यरत राहून हा वाढदिवस साजरा करत आहोत. संदेश हे लढवय्या कार्यकर्ते आहेत. अलिकडच्या काळात त्यांना क्षमतेनुसार राजकीय संधी मिळाली नाही हे खरे. पण, ते नेहमीच जनतेच्या मनातील आमदार राहिलेत. पारकर यांचे आतापर्यंतचे सामाजिक योगदान पाहता, त्यांना नक्कीच उज्ज्वल भवितव्य आहे. आपण सर्वांनीच त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
पारकरांच्या मनोकामना पूर्ण होवोत!
सतीश सावंत म्हणाले, कणकवली महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संदेश पारकर हे मला ज्युनिअर होते. पण, त्यावेळेपासूनच त्यांच्या नावामागे युवा नेता हे खास पद लागले. मध्यंतरी आम्ही दोघेही वेगवेगळय़ा पक्षात होतो. त्यामुळे आम्हाला पारकर यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचा योग येत नव्हता. पारकर यांचा वेगळा स्वभाव आहे. कुठेही भेटल्यानंतर ते आपुलकीने संवाद साधतात. ते तळमळीचे कार्यकर्ते आहेत. सध्या शिवसेनेत एकत्र काम करताना, ते घेत असलेला विकासाचा ध्यास मी सातत्याने पाहत असतो. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा असतो, हे तंत्र पारकर यांच्याकडून शिकावे. विधानसभा निवडणुकीतही मला विजयी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कणकवली शहर आदर्शवत व्हावे, यासाठी त्यांचा सदोदीत प्रयत्न राहिला आहे. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द संघर्षमय राहिली. मात्र, यापुढे येत्या काळात त्यांच्या सर्व राजकीय मनोकामना पूर्ण होतील.
पारकर हे तरुणांचे स्फूर्तीस्थान!
अतुल रावराणे म्हणाले, संदेश पारकर म्हणजे तरुणाईचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांचा वाढदिवस म्हणजे जिल्हय़ासाठी आगळा-वेगळा उत्सवच असतो. वाढदिवसानिमित्त दरवर्षी घेतले जाणारे महारक्तदान शिबीर व अन्य उपक्रम कौतुकास्पद आहेत. कणकवली शहराला वेगळे रुप देण्यासाठी आयुष्य त्यांनी खर्च केले आहे. माझी व त्यांची कित्येक वर्षांची मैत्री असून यापुढेही मी त्यांच्या सदैव सोबत राहीन.
रक्तदात्यांचे मनापासून आभार
शुभेच्छांना उत्तर देताना पारकर म्हणाले, आपण जन्माला आलो, त्या समाजाचे देणे लागतो, ही कर्तव्यभावना नेहमीच लक्षात ठेवली. त्यानुसारच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याला न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलो. वास्तविक, कोरोनासारख्या भीषण संकटामुळे आम्ही यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामाजिक भान राखत केवळ रक्तदान शिबिराचा उपक्रम दरवर्षीप्रमाणे हाती घेतला. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. म्हणूनच वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आम्ही आयोजित करत असतो. शेकडो रक्तदाते या शिबिरांमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात. या रक्तदात्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा
पारकर म्हणाले, गेल्या तीन दशकांच्या वाटचालीत जिल्हावासियांकडून सातत्याने प्रेरणा, शाबासकी, साथ मिळाली. जनतेचे आशीर्वाद नेहमीच पाठिशी राहिले. राजकीय वाटचालीत अनेकदा पक्ष बदलावे लागले. चढ-उतारही अनुभवले. पण, असंख्य सहकारी, कार्यकर्ते नेहमीच पाठिशी खंबीर उभे राहिले. या सहकाऱयांमुळेच मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळत असते. ‘संदेश आमचा हक्काचा माणूस’ असे अनेकजण सांगतात, यापेक्षा आनंदाची बाब नाही. राजकारणात कार्यरत असताना पद असो वा नसो, वेळोवेळी नागरिकांच्या गरजेनुसार आक्रमक झालो, आंदोलने केली, रस्त्यावरही उतरलो. तडजोड सहन न करता, नागरिकांच्या न्यायासाठी नेहमीच कार्यरत राहिलो. म्हणूनच आज कोणतेही पद नसतानाही जनता सदैव माझ्यासोबत राहिली.
शिवसैनिनकांनी मला खूप प्रेम दिले!
विधानसभा निवडणूक काळात मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत सर्वच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी मला खूप प्रेम दिले. राज्यात शिवसेनेची सत्ता असून आता यापुढे माझ्यासह प्रत्येक शिवसैनिक कोकणच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. यापुढेही जिल्हावासीयांना अपेक्षित असलेली भूमिकाच मी घेईन. मला साहेब व्हायचे नाही. आयुष्यभर तुमचाच सहकारी, कुटुंबियच राहायचे आहे. शिवसैनिक, पारकरप्रेमी यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
संदेश पारकर यांचा वाढदिवस आणि रक्तदान शिबीर हे वर्षानुवर्षाचे समिकरण. पारकर यांचा वाढदिवस म्हणजे कणकवली शहराचा एक उत्सवच ठरतो. यावर्षी कोरोनामुळे पारकर समर्थकांनी वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा न करता, केवळ रक्तदान शिबीर हाच एक सामाजिक उपक्रम घ्यायचे ठरविले. पारकर यांच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करून हे शिबीर दरवर्षीप्रमाणे यशस्वी केले. वास्तविक, रक्तदाते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. मात्र, ‘कोरोना’वर मात करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करणे गरजेचे असल्याने कै. सुबोध टिकले स्मरणार्थ रक्तदान शिबिरात दरवर्षीचा रक्तदात्यांचा उच्चांक गाठण्याचे कार्यकर्त्यांनी टाळले. मात्र, दुपारपर्यंत 150 दात्यांनी रक्तदान केले होते.