वृत्तसंस्था/ बर्लीन
जर्मनीतील बुंदेस्लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात रॉबर्ट लिव्हेनडोवेस्कीने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर चॅम्पियन्स बायर्न म्युनिच क्लबने फ्रीबर्गचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत या स्पर्धेत आपला विक्रमी सलग 15 वा विजय नोंदविला. बायर्न म्युनिच संघातील पोलंडच्या लिव्हेनडोस्वेस्की याने या स्पर्धेच्या हंगामात 33 गोल नोंदविले असून असा पराक्रम करणारा तो पहिला विदेशी फुटबॉलपटू आहे. गेल्या मंगळवारी बायर्न म्युनिच संघाने या स्पर्धेचे सलग आठव्यांदा जेतेपद निश्चित केले होते.
शनिवारच्या सामन्यात 15 व्या मिनिटाला किमीचने बायर्न म्युनिचचे खाते उघडले. 24 व्या मिनिटाला बायर्न म्युनिचचा दुसरा गोल लिव्हेनडोवेस्कीने केला. मध्यंतरापर्यंत बायर्न म्युनिचने 2-0 अशी आघाडी घेतली होती. खेळाच्या उत्तरार्धात लिव्हेनडोवस्की संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवित फ्रीबर्गचे आव्हान संपुष्टात आणले. फ्रीबर्गतर्फे एकमेव गोल लुकास होलेरने केला. विविध फुटबॉल स्पर्धामधील बायर्न म्युनिच संघाचा हा सलग 15 वा विक्रम विजय आहे.