सिडनी : संघव्यवस्थापनाने अद्याप त्याच्याशी याबाबत चर्चा केली नसली तरी भारतीय क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील उपकर्णधार केएल राहुलने संधी मिळाल्यास पुढील तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये यष्टीरक्षणाची धुरा सांभाळणे आपल्याला आवडेल, अशी महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील यष्टीरक्षणासाठी केएल राहुलने स्पेशालिस्ट यष्टीरक्षक ऋषभ पंत व संजू सॅमसन यांना यापूर्वीच पिछाडीवर टाकले आहे.
पुढील 3 वर्षांच्या कालावधीत 3 आयसीसी विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यात 2 लागोपाठ टी-20 विश्वचषक स्पर्धा व 1 वनडे विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे. आपण यष्टीरक्षण करु शकलो तर संघाला आणखी एक अवांतर फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येऊ शकतो, हा 28 वर्षीय केएल राहुलचा होरा आहे.
‘माझ्या मते यामुळे संघ आणखी समतोल करणे अधिक अनुकूल ठरेल. संधी मिळत असेल तर मी तिन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी आनंदाने स्वीकारेन’, असे केएल राहुल याप्रसंगी पुढे म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दि. 27 नोव्हेंबर रोजी पहिल्या वनडे लढतीने सुरु होणाऱया मालिकेपूर्वी आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत तो बोलत होता. आयसीसी स्पर्धांमध्ये यष्टीरक्षण करण्याविषयी संघव्यवस्थापनाने संवाद साधला आहे का, या प्रश्नावर त्याने नकारार्थी उत्तर दिले.
‘मला असे थेट काहीही सांगण्यात आलेले नाही. अर्थात, विश्वचषक स्पर्धा केव्हाही अतिशय महत्त्वाच्या असतात. सध्याच्या घडीला मी एकावेळी केवळ एका सामन्यावर विचार करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध मागील मालिकेत मी पाचव्या स्थानी फलंदाजी केली होती. त्यामुळे, कोणत्या फलंदाजी क्रमावर खेळायचे आहे, याचा मला फरक पडत नाही. मी प्रत्येक क्रमांकावर सेट होऊ शकतो’, असे केएल राहुलने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.