एफएसडीएलच्या चेअरमन निता अंबानी यांची घोषणा
क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
येत्या इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेचे आयोजन गोव्यात करण्याचा निर्णय फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंटल लिमिटेडने घेतला आहे. एफएसडीएलच्या संस्थापक आणि चेअरमन निता अंबानी यांनी काल रविवारी ही घोषणा केली. आयएसएल 2020-21 पर्वातील सर्व सामने आता फातोर्डा येथील नेहरु स्टेडियम, वास्कोच्या टिळक मैदान आणि बांबोळीच्या जीएमसी ऍथलेटिक स्टेडियमवर प्रेक्षकांविना खेळविण्यात येतील.
गोव्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आणि त्याची घोषणा करण्यात आपल्याला अतीव आनंद होत आहे. गेल्या मोसमात आयएसएलमधील अंतिम सामना फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. आता या स्पर्धेच्या सातव्या पर्वाची सुरूवातही गोव्यातून आम्ही करत असल्याचे नीता अंबानी म्हणाल्या. गोव्याचे फुटबॉलप्रेमी हे फुटबॉल खेळाचे जाणकार आहेत. आयएसएल फुटबॉल स्पर्धेचे आयोजन गोव्यात होणार असल्याने गोवा केंद्र फुटबॉलचे क्रेंदबिंदू ठरणार असल्याचे निता अंबानी म्हणाल्या.
आयएसएल सर्वांत लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा
मागील सहा वर्षांत देशी फुटबॉलचा स्तर आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनामुळे वाढला आहे. अल्पावधीतच भारतीय फुटबॉलचे नाव जागतिक क्षेत्रात पोहचले असून त्यामुळे उल्लेखनीय टप्पेही गाठले आहेत. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला हल्लीच वर्ल्ड लीग फोरममध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई एफसीसाठी सिटी फुटबॉल ग्रुपची गुंतवणूक, एटीकेचे मोहन बगानकडे विलीनीकरण तसेच आयएसएल फुटबॉल स्पर्धेचे चौथ्या सर्वांत लोकप्रिय लीगमध्ये समावेश झाला आहे. या सर्वांमुळे आयएसएल सर्वांत लोकप्रिय फुटबॉल स्पर्धा असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अंबानी म्हणाल्या.
खेळ हा सर्वांना एकत्र आणतो
खेळ हा सर्वांना एकत्र आणतो तसेच आनंदही देतो. सध्या महामारीचे संकट सर्वासमोर आहे. मी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्लबांची, खेळाडूंची तसेच सपोर्ट स्टाफची कृतज्ञता व्यक्त करते, असे त्या म्हणाल्या. आयएसएलच्या सुरळीत आयोजनासाठी फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड, गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा फुटबॉल संघटना तसेच राज्य प्रशासनाच्या सहकार्याने काम करणार असल्याचे अंबानी म्हणाल्या.
गोव्यातील सर्व स्टेडियम्स, सुविधांची पाहणी
एफएसडीएलने हल्लीच आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या पर्वासाठी गोव्यात असलेल्या साधनसुविधांची पाहणी केली असून लगेच तिन्ही स्टेडियम्सची आऊटफिल्ड, डेनेज, फ्लडलाईटस, खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम्सच्या डागडुजींचे कामही पूर्ण करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांना सरावासाठी दहा मैदानेही पाहण्यात आली आहेत. ही मैदाने सहभागी संघांना देण्यापूर्वी यात सुधारणा करण्यात येणार आहेत.
सराव करण्यासाठी मैदानांची दुरूस्ती आयएसएलच्या निमित्ताने झाल्यानंतर गोव्यात चांगली फुटबॉल मैदाने तयार होणार असून राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यासाठी गोवा एक महत्वपूर्ण केंद्र बनणार आहे.