वृत्तसंस्था/ हैद्राबाद
जर्मनीतील सुरू झालेल्या सारलोरलक्स खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून भारताच्या पुरूष संघातील सर्व बॅडमिंटनपटूंना माघार घ्यावी लागत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा विद्यमान विजेता लक्ष्य सेन याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याने स्पर्धां आयोजकांनी संपूर्ण भारतीय बॅडमिंटन संघाला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.
कोरोना बाधित लक्ष्य सेनचे वडील हे लक्ष्यचे प्रशिक्षकही आहेत. या स्पर्धेत बुधवारी भारताच्या अजय जयराम आणि शुभंकर डे यांचे पुरूष एकेरीतील दुसऱया फेरीतील सामने खेळविले जाणार होते पण स्पर्धां आयोजकांनी उशिरा निर्णय घेतल्याने या स्पर्धेतून लक्ष्य सेन, अजय जयराम आणि शुभंकर डे यांनी माघार घेतली आहे. आता या स्पर्धेत भारताचे हे तीन बॅडमिंटनपटू यापुढे सहभागी होणार नाहीत, असा खुलासा स्पर्धां आयोजकांनी दिला आहे. सदर स्पर्धा मंगळवारी सुरू झाली होती. बुधवारी महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या मालविका बनसूदला इस्टोनियाच्या कुबाकडून 21-12, 21-19 अशी हार पत्करावी लागली. लक्ष्यचे वडील आणि प्रशिक्षक डीके सेन यांची कोरोना चांचणी घेण्यात आली त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. भारताच्या अजय जयरामने मंगळवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या फेरीचा सामना जिंकला होता.