ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. खासदारकीचा कार्यकाळ संपत आलेला असताना संभाजीराजेंनी राऊतांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आज सकाळी संभाजीराजे हे संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आले. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. खासदारकीचा कार्यकाळ संपत आला असताना आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या भेटीनंतर माध्यमांनी संभाजीराजेंना गाठले. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, आजची भेट औपचारीक होती. संजय राऊत माझे जुने मित्र आहेत. चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या घरी आलो. आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते दरवर्षी मला आणि शरद पवारांना जेवायला बोलावतात. एक खासदार दुसऱ्या खासदाराला भेटू शकतो, हेच दिल्लीचं वैशिष्टय़ आहे, असे संभाजीराजे म्हणाले.