येळ्ळूर महाराष्ट्र राज्य कुस्ती आखाडा खटला
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर येथील कुस्ती आखाडय़ामध्ये निवडणुकीदरम्यान भाषण केल्याने आचारसंहितेचा भंग केला म्हणून संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील न्यायालयात सुरू आहे. गेल्या काही तारखांपासून संभाजी भिडेगुरुजी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर वॉरंट काढण्यात आले होते. वॉरंट रिकॉल करण्यासाठी मंगळवारी ते न्यायालयात दाखल झाले होते.
येळ्ळूरच्या कुस्ती मैदानात 2018 साली संभाजी भिडेगुरुजी यांच्यासह शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे हजर होते. त्यावेळी विधानसभा निवडणुका सुरू होत्या. संभाजी भिडेगुरुजी यांनी योग्य उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्यासह येळ्ळूर महाराष्ट्र राज्य कुस्ती आखाडय़ाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील द्वितीय जेएमएफसी न्यायालयामध्ये सुरू आहे.
या खटल्यात संभाजी भिडेगुरुजी, किरण गावडे, मारुती कुगजी (मयत), प्रदीप देसाई, विलास नंदी, डी. जी. पाटील, मधू पाटील, नागेंद्र पाखरे, दुद्दाप्पा बागेवाडी, लक्ष्मीकांत मुतगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये खटला सुरू आहे.
मंगळवारी न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे हा खटला सातवे जेएमएफसी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. त्या ठिकाणी भिडेगुरुजी यांचे रिकॉल करून घेण्यात आले. या खटल्यात कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर,
ऍड. मारुती कामाण्णाचे हे काम पाहत आहेत.