कौलालंपूर (मलेशिया)
आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक आशिया पात्र फेरीच्या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातच्या महिला संघाने मलेशियाचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात संयुक्त अरब अमिरात संघातील डावखुरी मध्यमगती गोलंदाज माहिका गौरने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान मलेशियाने 20 षटकांत 9 बाद 33 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने चार षटकांमध्ये 1 बाद 34 धावा जमवित हा सामना 9 गडय़ांनी जिंकला. मलेशियाची तिसऱया षटकांत स्थिती 4 बाद 4 अशी केविलवाणी होती. या स्पर्धेत गेल्या शनिवारी झालेल्या नेपाळविरूद्धच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातच्या माहिका गौरने 5 गडी बाद केले होते. मलेशियाच्या डावातील तिसऱया षटकांत गौरने हॅट्ट्रीक साधली. मलेशियाच्या डावात नुरूल अदेबने 22 चेंडूत 11 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना संयुक्त अरब अमिरात संघातील लावण्या केणीने नाबाद 13 तर तीर्था सतीशने पाच धावा जमविल्या.