ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोल्कान बोजकिर यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. बोजकिर यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
बोजकिर हे तुर्कीचे राजन्यायिक अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75 व्या सत्रासाठी ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या निमंत्रणावरून 26, 27 जुलै रोजी ते पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, बोजकिर यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करत असल्याचे सांगितले.
बोजकिर यांचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याने पाकिस्तानचा हिरमोड झाला आहे. या दौऱ्यात पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्या उपस्थित करण्यात येणार होता. तसेच महासभेशी निगडीत अजेंड्याचे मुद्दे आणि प्राथमिकता असलेल्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, हा दौराच रद्द झाल्याने पाकला धक्काच बसला. आगामी काळात लवकरच पाकिस्तानचा दौरा करता येईल, अशी अपेक्षाही बोजकिर यांनी व्यक्त केली आहे.