ऑनलाईन टीम / डकार :
ईशान्य नायजेरियातील जिहादींनी संयुक्तराष्ट्रांच्या मदत सामग्री पोचवणाऱ्या व्यक्तींवर गोळीबार करत त्यांच्या हेलिकॉप्टरला आग लावली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. नायजेरीयाचे अध्यक्ष मेहम्मदू बुहारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बुहारी म्हणाले, बोको हराम या इस्लामिक दहशतवाद्यांनी प्रभावित क्षेत्रात मदत साहित्य पोहचवणाऱ्या संयुक्तराष्ट्रांच्या दोन व्यक्तींवर गोळीबार केला. तसेच त्यांच्या हेलिकॉप्टरला आग लावली. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांवर नायजेरियाने मोठी कारवाई सुरू केल्याने त्यांची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच या नैराशातून त्यांनी आता निरपराध नागरिकांना लक्ष करणे सुरू केले आहे.
नायजेरियाच्या उत्तरपूर्वेकडील भागात बोको हरामचे मोठे प्राबल्य आहे. उत्तर-पश्चिम नायजेरियातील मदत गटांच्या सुरक्षेचा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. बोको हराम जवळजवळ दशकभरापासून मानवी हक्क कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांना ठार मारत आहे. मात्र शनिवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.