बेनकनहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील गणेशपूर येथील खासगी जागेवरील प्रकार, दहा जणांविरोधात गुन्हा
वार्ताहर /हिंडलगा
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांना सोबत घेऊन दादागिरी करत खासगी जागेवरील संरक्षक भिंत जबरदस्तीने हटविल्याचा निंदनीय प्रकार शुक्रवारी (दि. 11) दुपारी गणेशपूर येथे घडला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सदस्यांच्या दादागिरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया सरस्वतीनगर, गणेशपूर येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला मोहिते व इतर काही नागरिकांची मालकी जागा आहे. सदर जागा ताब्यात घेऊन तेथील रस्ता रुंदीकरण करण्याचा घाट ग्राम पंचायतीने घातला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच ग्राम पंचायतीच्या पीडीओ व काही सदस्यांनी मालमत्ताधारकांना कोणतीच पूर्वकल्पना न देता सदर जागेवर असलेली इमारत व संरक्षक भिंती जबरदस्तीने जमीनदोस्त करून लाखो रुपयांचे नुकसान केले.
रस्त्याला न्यायालयाची स्थगिती मिळाल्यानंतरही पुन्हा दादागिरी
या विरोधात जागामालक मोहिते व इतरांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासह पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शिवाय न्यायालयाकडून रस्ता रुंदीकरणाला स्थगिती देखील मिळविली आहे. त्यानंतर प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने ग्राम पंचायतीने आपला काही संबंध नसल्याचे सांगत बाजूला होण्याचा प्रयत्न केला होता. तसेच 60 फूटऐवजी 30 फुटांचा रस्ता देखील डांबरीकरण करण्यात आला. त्यामुळे मोहिते व इतर जागामालकांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या जागेवर लाकडी खांब उभारून तारांच्या साहाय्याने संरक्षक भिंत बांधून घेतली होती.
शुक्रवारी (दि. 11) पुन्हा एका ग्राम पंचायत सदस्याने आपल्या आठ ते दहा सहकाऱयांना साथीला घेत दादागिरी करत जबरदस्तीने संरक्षक भिंत हटवून पुन्हा नुकसान केले आहे. त्यामुळे जागामालक मोहिते व इतरांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला असून दादागिरी करत आपल्या खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल एका ग्राम पंचायत सदस्यासह दहा जणांविरोधात कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका संघटनेचा तालुका अध्यक्ष देखील सहभागी असल्याचे बोलले जात आहे.