ऑनलाईन टिम / लखनऊ
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लखनौमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र (DTTC) आणि ब्रह्मोस उत्पादन केंद्राची पायाभरणी केली.
“उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर (UP DIC) मध्ये संरक्षण आणि एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सच्या वाढीला गती देण्यासाठी सुमारे 22 एकरांवर अशा प्रकारचे पहिले संरक्षण, तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र (DTTC) उभारले जात आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये सहा उपकेंद्रांचा समावेश असून डीप-टेक इनोव्हेशन आणि स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर, डिझाईन आणि सिम्युलेशन सेंटर, टेस्टिंग आणि इव्हॅल्युएशन सेंटर, सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0/डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, कौशल्य विकास केंद्र आणि व्यवसाय विकास केंद्र यांचा समावेश आहे.
ब्रह्मोस एरोस्पेसने घोषणा केलेले ब्रह्मोस उत्पादन केंद्र, यूपी डीआयसीच्या लखनौ नोडमधील एक आधुनिक, अत्याधुनिक सुविधा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. हे 200 एकर क्षेत्र पसरलेले असून तिथे नवीन ब्रह्मोस-एनजी (नेक्स्ट जनरेशन) क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यात येईल. “हे नवीन केंद्र पुढील दोन ते तीन वर्षांत तयार होऊन आणि दरवर्षी 80-100 ब्राह्मोस-एनजी क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू करेल.”