सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : गोवा शिपयार्डच्या स्वदेशी प्रकल्पाचे उद्घाटन
प्रतिनिधी / वास्को
संरक्षण मंत्रालयाच्या आत्मनिर्भर सप्ताहात गोवा शिपयार्डमध्ये स्टिल प्रिपरेशन शॉप फॅसिलिटी या पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन डिजिटल माध्यमाद्वारे केंदीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व आयुषमंत्री श्रीपाद नाईक व गोवा शिपयार्डचे अधिकारी उपस्थित होते. डिजिटल उद्घाटन थेट व्हिडिओ लिंकद्वारे नवी-दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयात सामाजिक अंतराचे पालन करून करण्यात आले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या आवश्यकतेवर भर दिला. संरक्षण दलात स्वदेशी क्षमता निर्माण करणे व विस्तार करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. गोवा शिपयार्डमधील हा प्रकल्प संरक्षण दलाच्या सज्जतेसाठी सैन्य दलाचा आत्मविश्वास वाढविण्यात महत्वपूर्ण ठरेल असे ते म्हणाले.
प्रकल्प आत्मनिर्भरतेसाठी सहाय्यक
गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोमोडोर बी. बी. नागपाल म्हणाले की, आज या सुविधेच्या उद्घाटनामुळे शिपयार्डची उत्पादन क्षमता वाढेल आणि देशात आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरेल. गोवा शिपयार्डच्या अत्याधुनिकरण प्रकल्पातील तिसऱया टप्प्यात 27 कोटी रूपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
गोवा शिपयार्डतर्फे दि. 7 ते 14 ऑगस्टपर्यंत आत्मनिर्भर सप्ताहाचा भाग म्हणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दि. 13 ऑगस्ट रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या अपतटीय गस्तीनौकेचे जलावतरण, दि. 14 रोजी आयआयटी गोवा यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच गोवा शिपयार्डने तटरक्षक दलाच्या अपतटीय गस्तीनौकेसाठी विकसीत केलेल्या स्वदेशी गीयर बॉक्सचे अनावरण करण्यात येणार आहे.