प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खासकरून संवेदनशील भागातील हालचालींवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून वाहतूक बंद करण्यात आली होती.
रविवारी सकाळी येथील खडेबाजार पोलीस स्थानकात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदी अधिकाऱयांनी मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुकीला फाटा देण्यात आला आहे.
सायंकाळी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी आदी अधिकारी खडक गल्ली परिसरात ठाण मांडून होते.
खंजर गल्लीसह अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभे करून पोलिसांनी वाहतूक अडविली होती. चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसचा मार्ग अडविण्यात आला होता. श्री विसर्जन शांततेत पार पाडावे, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. बंदोबस्तासाठी एकूण बाराशेहून अधिक पोलीस जुंपण्यात आले होते.