न्यायासाठी लढणाऱया मातेकडून उमेदवारी
यंदा केरळच्या निवडणुकीत एक चिन्ह मानवी संवेदना आणि संघर्षाचे प्रतीक ठरले आहे. हे निवडणूक चिन्ह ‘बेबी फ्रॉक’ असून जे केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात धरमादम मतदारसंघात उभ्या राहिलेल्या एका महिला उमेदवाराला देण्यात आले आहे. या निवडणूक चिन्हामागे न्याय मागणाऱया एका मातेचे अश्रू आहेत. या बेबी फ्रॉक निवडणूक चिन्हामागील कथा मनाला हादरवून टाकणारी आहे. केरळच्या पलक्कडमध्ये 2017 साली अल्पवयीन वालयार बहिणींच्या मृत्यूने पूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
न्यायाची आस
या मुलींना कथितरित्या बलात्कारानंतर त्यांच्या झोपडीत फासावर लटकविण्यात आले होते. 13 वर्षीय मोठय़ा बहिणीचा मृतदेह 13 जानेवारी 2017 रोजी मिळाला होता. तर 4 मार्च रोजी छोटय़ा बहिणीचा मृतदेह मिळाला होता. वालयार बहिणींच्या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने 4 संशयितांची मुक्तता केली होती, यानंतर केरळमध्ये मोठय़ा प्रमाणावर निदर्शने झाली होती. यामुळे केरळ उच्च न्यायालयाने याप्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
न्यायासाठी मातेचा संघर्ष
तेव्हापासून या मुलींची आई न्यायासाठी दाद मागत आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. या मातेला बेबी फ्रॉक निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. वालयार बहिणींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपासात सारवासारव केल्याचा आरोप महिलेने केला होता. स्वतःच्या मुलींसाठी संघर्ष करणाऱया या महिलेने बेबी फ्रॉक या निवडणूक चिन्हाची मागणी केली होती.
सत्तास्थानाचा हौस नाही
स्थानिक अधिकाऱयांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत खेटे घातल्यावर वालयार बहिणींच्या आईने आता मतदारांसमोर हात जोडले आहेत. मला आमदार किंवा मंत्री होण्याची हौस नाही. मी केवळ धर्मासाठी लढत आहे. न्याय कुठे आहे असा मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या महिलेच्या संघर्षात आता सामाजिक कार्यकर्तेही सामील झाले आहेत.