प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील संशयित करोना रूग्णाच्या थुंकीचे नमुने (स्वाब) तपासणीपूर्वीच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) नकार दिला. रूग्णाच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार कोरोना विषाणूशी निगडीत कोणतीच लक्षणे नाहीत. त्यामुळे असे नमुने पुन्हा पाठवू नका, असेही संस्थेने सीपीआर प्रशासनाला कळवले आहे.
ची धास्ती घेतलेल्या संशयित रूग्णाने तपासणीसाठी डॉक्टरांनाच धमकी दिल्याने सीपीआरमध्ये खळबळ माजली होती. मात्र ‘एनआयव्ही’ने लक्षणावरून नमुना नाकारल्याने कोल्हापुरातील संशयित रूग्णाकडून झालेल्या तपासणीच्या मागणीच पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापुरात 3 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री, आरोग्य राज्यमंत्री लोकशाही दिन घेतला. यावेळी उचगाव येथील संशयित करोना रूग्ण सीपीआरमध्ये आला. ‘करोना’च्या भीतीने त्याने तपासणीसाठी थेट डॉक्टरांवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. डॉ. विजय बर्गे आणि त्यांच्या पथकाने त्याची करोना वॉर्डमध्ये तपासणी केली. त्याच्या घशातील थुंकीचा नमुना पुणे येथील एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) कडे पाठवला होता. याबाबताची माहिती असणारे पत्र गुरूवारी सायंकाळी सीपीआरला मिळाले. संशयित रूग्णाच्या थुंकी नमुन्यासोबत पाठवलेल्या अहवालात त्याला सर्दी, खोकला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘एनआयव्ही’ने संशयिताचा थुंकी नमुना तपासणीस नकार दिला आहे. त्याच्या रिपोर्टमध्येच ‘कोरोना’शी निगडीत कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे रूग्णांची लक्षणे पाहुनच यापुढे नमुने तपासणीसाठी पाठवा, असेही ‘एनआयव्ही’ने सीपीआर प्रशासनाला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हय़ात कोरोना रूग्ण नसल्याचे स्पष्ट : डॉ. मीनाक्षी गजभिये
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये म्हणाल्या, संशयित कोरोना रूग्णांच्या प्राथमिक तपासणीत सर्दी, खोकल्यासारखी प्राथमिक लक्षणेही दिसून आलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने हा नमुना तपासणीस नाकारला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हय़ात आता कोरोनाचा संशयित रूग्णही नसल्य़ाचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांना धमकी
संशयित कोरोना रूग्ण हा चीनमधील शाघांय येथील टेक्स्टाईल कंपनीत कार्यरत होता. तेथे करोना साथ पसरण्यापूर्वीच तो भारतात आला आहे. घशात खवखवत असल्याने तो सीपीआरमध्ये आला होता. आपल्याला कोरोना रोगाची लागण झाल्याची धास्ती त्याने घेतली. यातूनच त्याने सीपीआरमध्ये डॉक्टरांना धमकी देत आपल्या वैद्यकीय तपासणी पुण्यातून करून घ्यावी, असा आग्रह धरला होता. आता पुण्यातून आलेल्या माहितीनुसार जिल्हय़ात कोरोना रूग्ण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनाने संबंधित रूग्णावरील उपचार बंद केले आहेत.