महाराष्ट्र, तामिळनाडू अनुक्रमे दुसऱया-तिसऱया स्थानी
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय नीती आयोगाने बुधवारी जाहीर केलेल्या दुसऱया इनोव्हेशन यादीत (संशोधन निर्देशांक) कर्नाटकाने सलग दुसऱया वर्षीही आघाडीचे स्थान पटकावले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान आणि जैविक तंत्रज्ञानमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी ट्विटरवर समाधान व्यक्त केले आहे.
नीती आयोगाने जाहीर केलेल्या संशोधन निर्देशांकाच्या यादीत कर्नाटकानंतर महाराष्ट्र आणि तामिळनाडूने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. चौथ्या स्थानी तेलंगण आणि पाचव्या स्थानी केरळ राज्य आहे. आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार आणि कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी बुधवारी निर्देशांक जाहीर केले. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या (जागतिक संशोधन निर्देशांक) धर्तीवर यासंबंधीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या यादीत झारखंड, छत्तीसगड आणि बिहार ही राज्ये शेवटच्या स्थानी आहेत.
इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 मध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सापेक्ष कामगिरीच्या आधारे राज्ये आणि केंद्रप्रशासित राज्यांना निर्देशांक दिले जाते. राज्यांची संशोधन क्षेत्रातील कमकुवत बाजू शोधून त्यांना या दिशेनं सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागचा हेतू आहे.
नीती आयोगाने जाहीर केलेल्या यादीत कर्नाटकाने प्रथम स्थान पटकावल्याबद्दल प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी, मागील वेळेच्या तुलनेत यावेळी आणखी नवे निकष लागू करण्यात आले होते. संशोधन आणि विकासासाठी राज्ये करणारा खर्च आणि नव्या उद्योगांची नोंदणी हे यामध्ये प्रमुख निकष मानण्यात आले होते. कर्नाटकाने सर्वच निकषांमध्ये बाजी मारली आहे, असे सांगितले.