दोन भागांमध्ये होणार अधिवेशन, अर्थसंकल्पासह अन्य विधेयकेही सादर होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. हे अधिवेशन दोन भागांमध्ये होणार असून प्रथम भाग 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. दुसरा भाग 14 मार्च ते 8 एप्रिल असा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रत्येक वर्षी दोन भागांमध्येच घेतले जाते. याहीवर्षी हीच परंपरा राखली जाणार आहे. 31 जानेवारीला विद्यमान अर्थिक वर्षाचे आणि अर्थव्यवस्थेचे सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. त्यातून अर्थव्यवस्थेच्या स्थितीची कल्पना येणार आहे. 1 फेब्ा्रgवारीला अर्थसंकल्प सादर होणार असून या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अनेक मागण्या आहेत.
अर्थसंकल्प सज्ज करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासूनच सुरु झाली असून अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध क्षेत्रांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा सध्याच्या दीड लाखांवरुन तीन लाख रुपये करावी, अशी महत्वपूर्ण सूचना सीएंच्या संस्थेने केली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता नोकरदार आणि उद्योग यांना करसवलतींचीही अपेक्षा आहे. मात्र सरकारला देशाचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात ताळमेळ राखूनच या मागण्यांवर विचार करावा लागणार आहे. एकंदर, नेहमीप्रमाणे उत्सुकता ताणली गेली आहे.
दुसऱया भागात होणार चर्चा
अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चा अधिवेशनाच्या दुसऱया भागात होईल अशी शक्यता आहे. तोपर्यंत सर्व सदस्यांना अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मिळेल. विरोधकांनाही सरकारला प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.