भारतासह जगभर महिला दिन साजरा – सोशल मीडियावरही धूम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय महिला दिन सोमवारी भारतासह जगभर साजरा करण्यात आला. विविध संस्था-संघटनांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठीही विविध कार्यक्रम घेण्यात आले. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशाप्रकारचे कार्यक्रम कमी गर्दीत साजरे झाले. प्रत्यक्ष कार्यक्रम-सोहळय़ांबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्हर्च्युअल कार्यक्रम पार पडले. तसेच व्हॉट्सऍप, इन्टाग्राम आदींच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त शुभेच्छा देणारे संदेशही पसरविले जात होते. दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया टप्प्यात महिलांना 50 टक्के आरक्षणाची मागणी संसदेत करण्यात आली.
महिला दिनानिमित्त सोमवारी संसदेत प्रथम महिला खासदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक महिला खासदारांनी महिलांना 50 टक्के आरक्षणाची मागणी केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात महिलांच्या हितार्थ अनेक योजना राबविण्यात येत असल्याचा दावा महिलांच्या मुद्यावरील चर्चेदरम्यान भाजप खासदार सरोज पांडे यांनी केला. मोदींनी बेटी पढाओ आणि बेटी बचाओ सुरू केले ज्यामुळे महिलांचा दर्जा सुधारल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राजीव गांधी यांच्या कार्यकाळातही महिलांसंबंधी अनेक कामे झाल्याचे काँग्रेसच्या खासदारांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनीही सभागृहात महिलांच्या समर्थनार्थ अनेक मते नोंदवली.
पंतप्रधानांनी केली ऑनलाईन खरेदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महिला दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व महिलांचे अभिनंदन केले. तसेच महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंची ऑनलाईन खरेदीही केली. त्यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ऑनलाईन खरेदी करताना पंतप्रधानांनी सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असलेल्या राज्यांची निवड केल्याचे दिसून येते. तामिळनाडूच्या टोडा जमातीच्या शाल, गोंड पेपर पेंटिंग, पारंपरिक नागा शाल, आसाममधील पारंपरिक शाल (गमछा), केरळमधील निलाविलक्कू (दिव्याचा विशेष प्रकार), पश्चिम बंगालमधील काथ्यापासून बनविण्यात आलेल्या फाईल्सची खरेदी मोदींनी केली.