मागील 24 तासांत 6,473 जणांना डिस्चार्ज : 6,257 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मागील दोन आठवडय़ापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्यात संसर्गमुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख पार झाली आहे. मंगळवारी 6,473 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात रुग्ण बरे होण्याचा हा नवा उच्चांक आहे. दरम्यान मागील 24 तासांत 6,257 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 86 बाधितांचा बळी गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बळ्ळारी आणि बेळगाव जिल्हय़ात बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार राज्यात आतापर्यंत 1,88,611 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,05,599 संसर्गमुक्त झाले आहे. तर 3,398 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारातील रुग्णसंख्या 79,606 इतकी झाली आहे. त्यापैकी 699 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.
मंगळवारी दिवसभरात बेंगळूर शहर जिल्हय़ात 1,610, बळ्ळारीत 736, बेळगाव 575, धारवाड 276, मंगळूर 243, म्हैसूर 238, उडुपी 219, रायचूर 201, शिमोगा 189, दावणगेरे 172, कोप्पळ 169, गुलबर्गा 156, हासन 146, मंडय़ा 141, बागलकोट 135, विजापूर 121, यादगीर 102, रामनगर 96, चिक्कमंगळूर 93, तुमकूर 89, गदग 78, कारवार आणि बिदर जिल्हय़ांत प्रत्येकी 73, चामराजनगर 72, कोलार 69, चित्रदुर्ग 47, कोडगू 41, हावेरी 36, चिक्कबळ्ळापूर 33 तसेच बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत.