नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर दिल्लीतील निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. रुग्ण कमी होत असल्यामुळे काही प्रमाणात निर्बंध कमी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने शुक्रवारी जाहीर केला. सुधारित मार्गसूचीनुसार शाळा, महाविद्यालये आणि जीम उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच दिल्लीत सध्या नाईट कर्फ्यू सुरू राहणार आहे. मात्र, आता त्याची वेळ बदलून रात्री 11 ते पहाटे 5 अशी करण्यात आली आहे. रेस्टॉरंट्स आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. यापूर्वी त्यांना रात्री 10 वाजेपर्यंतच उघडण्यास परवानगी होती. त्याचबरोबर सर्व कार्यालये आता 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शुक्रवारी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या 7 फेब्रुवारीपासून शैक्षणिक संस्था आणि कोचिंग इन्स्टिटय़ूट नियमानुसार सुरू होतील. टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्यालये सुरू होणार असून प्रथम 7 फेब्रुवारीपासून 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्गही सुरू राहणार आहेत. त्यानंतर 14 फेब्रुवारीपासून नर्सरी ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. या वर्गातील शिक्षकांनी संपूर्ण लसीकरण केले असेल तरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.
आता दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने कमी होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांचा रोजगार सुरू राहावा आणि लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी सरकारने आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचे बैठकीनंतर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.