प्रा. डॉ. नंदकुमार मोरे : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे मराठी विषय शिक्षकांची कार्यशाळा
प्रतिनिधी / बेळगाव
समृद्ध गोष्टींचा विचार, अंतर्मुख होऊन भाषेचा विचार, वर्ग शाळा व घर आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. चांगले वाचन व चांगली भाषा आणि संस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी मराठी भाषा हे प्रभावी माध्यम आहे या सूत्राचा वापर केल्यास उत्तम शिक्षक होऊ शकतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सार्वजनिक शिक्षण खाते, बेळगाव जिल्हा दक्षिण आणि बालिका आदर्श विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विषय शिक्षकांच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे म्हणाले, समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी तर भाषा समृद्ध आहेच पण मातृभाषेतून दिले जाणारे ज्ञान हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे शस्त्र होऊ शकते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालिका आदर्श विद्यालयाचे चेअरमन गोविंदराव फडके होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे बिटा स्पोर्ट्स क्लबचे मालक रविंद्र बिर्जे, कर्नाटक राज्य माध्यमिक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी, शहराध्यक्ष संजय नरेवाडकर, खानापूर अध्यक्ष बी. ए. पाटील, ग्रामीण अध्यक्ष शिवाजी जाधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय सुजाता देसाई, अश्विनकुमार पाटील व विजय पार्लेकर यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे रविंद्र बिर्जे यांनी कार्यशाळेचे कौतुक केले. त्यानंतर रायगड शिवाजी स्मारकाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा कर्तुत्वाचा इतिहास उलगडत दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनात्मक माहिती दिली. यानंतर गोविंदराव फडके यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
यानंतर मराठी विषयात 100 टक्के निकाल लागलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या जिजामाता हायस्कूलच्या मराठी विषय शिक्षक पी. सी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विश्वास गावडे यांनी केले. आभार मंजुनाथ गोलीहळ्ळी यांनी मानले. एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सी. वाय. पाटील, रणजित चौगुले, कविता चौगुले, उमेश बेळगुंदकर, नेत्रा कुलकर्णी, उषा कुंदर, आर. पी. पाटी, नितीन रेवणकर, सुरेश इटगीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचे सहकार्य लाभले.