सम्राट क्लब मयेचा अधिकारग्रहण सोहळा संपन्न
प्रतिनिधी /पणजी
नेतृत्व करणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच साध्य होते असे नाही. सर्वांना विचारात, विश्वासात घेऊन निःपक्षपातीपणे काम केल्यास कोणतीही संस्था पुढे जाण्यास वेळ लागणार नाही. ‘सम्राट क्लब’ हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन सागर जावडेकर यांनी केले.
सम्राट क्लब मये या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सम्राट क्लब गोवाचे अध्यक्ष दीपक नार्वेकर अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते मये सम्राट क्लबचे नूतन अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांच्याकडे पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. मावळते अध्यक्ष बाबुसो गावकर, राज्य कार्यकारिणी सचिव प्रवीण सबनीस तसेच यदुनाथ शिरोडकर, अर्जुन नाईक व राजेश कळंगुटकर इत्यादी उपस्थित होते. दैनिक तरुण भारत गोवाचे निवासी संपादक सागर जावडेकर यांनी आपल्या भाषणात सम्राट क्लब गोव्याच्या संस्कृती संवर्धनात महत्त्वाची पावले उचलत आहे. संस्था टिकल्या पाहिजेत, टिकविल्या पाहिजेत. माणूस कधी एकटा राहू शकत नाही. तो समुहात राहतो. त्यातून माणसे एकत्र आली. एकमेकांना मदत करीत गेली आणि हळूहळू सामाजिक कार्य करीत असताना संस्था उदयास आल्या. सम्राट क्लब गोव्यात अनेक उपक्रम राबविते. त्यातून या संस्थेचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण गोव्यात झाला. गोव्याची अन्नसंस्कृती टिकविण्यासाठी सम्राटने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मये-वायंगिणी येथील पंचायत सभागृहात झालेल्या या समारंभाला गावातील अनेक मंडळी उपस्थित होती. राज्य सचिव प्रवीण सबनीस यांनी नूतन सभासदांना शपथ देवविली आणि सम्राट क्लबची उद्दीष्टे स्पष्ट करून सांगितली. राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी नूतन कार्यकारिणीला शपथ देवविली. यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की सम्राट क्लब ही आता जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचलेली संस्था आहे. ही संस्था केवळ गोव्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर तिचे कार्य देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवरही या संस्थेच्या शाखा आहेत. प्रत्येकाने जबाबदारीने व मनापासून कार्य केल्यास क्लब हा सातत्याने जनतेच्या मनात राहील. एकमेकांच्या सहकार्यानेच संस्थेचा विकास होता होता प्रत्येक घटकाचा विकास होईल, असे दीपक नार्वेकर पुढे म्हणाले. खास पाहुणे म्हणून राज्य एकचे गटप्रमुख यदुनाथ शिरोडकर उपस्थित होते. त्यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. बाबुसो गावकर यांनी सर्वांचे आभार मानले. नूतन अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्यावरची जबाबदारी कर्तव्यदक्ष राहून पार पाडणार. सर्वांनी या कामी मदत करण्याचे आवाहन केले.
संजय सालेलकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले. अपराजिता मांद्रेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश कळंगुटकर यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक सदानंद मिशाळ उपस्थित होते.