सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशराम जाधव यांनी डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्त सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समितीच्या वतीने शाळेच्यासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संस्थेच्या उपाध्यक्षांनी सर्व आरोप फेडाळून लावल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी संस्थेचे अनुदान बंद करण्याची मागणी केली.
संस्था अध्यक्ष जाधव शिक्षकांचे आर्थिक, मानसिक शोषण करत आहेत. दरमहिन्याच्या पगारातून एक दिवसाचा पगार कपात करतात. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी लाखो रूपयांची लाच मागतात. शिक्षकांना आपल्या घरातील वैयक्तिक कामे करायला लावतात. मद्य प्राशन करून महिला शिक्षकांना आर्वाच्य भाषेत बोलतात, यासह अन्य आरोप निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. संस्था उपाध्यक्षकांनी आरोप फेटाळून लावल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी अध्यक्ष एस.डी.लाड, वसंतराव देशमुख, भरत रसाळे, दादा लाड, खंडेराव जगदाळे, संतोष आयरे, राजेंद्र कोरे, प्रा. सी. एम. गायकवाड, अशोक पोवार, रमेश मोरे, एम.डी. पाटील, आनंदा हिरुगडे, अनिल सरक, टी.आर. पाटील, सविता गिरी, कुमार पाटील, महादेव डावरे, सुधाकर सावंत, सुधाकर निर्मळे आदी उपस्थित होते.
सोमवारी शिक्षक आणि संस्था अध्यक्षांची बैठक
संस्था अध्यक्ष, संचालक आणि शिक्षक संघटनांचे नेते, नागरी कृती समितीचे नेते, संबंधीत अन्यायग्रस्त शिक्षक यांची बैठक घेवून योग्य तो तोडगा काढला जाईल. तसेच मुख्याध्यापक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
शिक्षक आमदार जयंत आसगावकर
आंदोलकांनी दारू पिऊन धक्काबुक्की केलेला व्हिडीओ दाखवावा
संस्थेच्या अध्यक्षांनी दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप मुख्याध्यापक व शिक्षकांनी केला आहे. त्यांनी पुरावा म्हणून व्हिडीओ दाखवावा. शिक्षक संघटनां सांगण्यावरून केलेले खोटे-नाटे आरोप कोणत्याही पुरावा नसताना केलेले आहेत.
संस्थेच्या उपाध्यक्षा सुमित्रा जाधव
संस्थेचे गेट बंद केल्याने आंदोलक झाले आक्रमक
पोलीसांच्या परवानगीने मुख्य आंदोलन चालू असताना संस्थेचे गेट बंद करणे, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना कोंडून ठेवणे यावरून आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आमदार आसगावकर यांना संस्थेच्या वर्गखोल्यातील शिक्षकांना बाहेर काढण्याची विनंती केली. आमदार आसगावकर यांनी बंद खोलीतील शिक्षकांना बाहेर काढून घरी जाण्याच्या सूचना दिल्या.