ऑनलाईन टीम / पुणे :
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत नामदेव, संत रामदास स्वामी अशी तब्बल २५ भारतीय संतांची चित्रे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. वारकरी दिंडीने चिमुकल्यांनी या संतांची चित्रे सदाशिव पेठेतील अटल कट्टा येथे आणत संतांची महती सांगणारे सकल संत हे चित्र प्रदर्शन भरविले आहे.
निनाद, पुणे आणि कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कलातीर्थ संस्थेच्या रौप्यमहोत्सवीवर्षानिमित्त सकल संत या प्रदर्शनाचे आयोजन सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकातील सुजाता मस्तानी जवळ असलेल्या अटल कट्टा येथे करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक न.म.जोशी, आयोजक निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, कलातीर्थचे संचालक अमोल काळे आदी उपस्थित होते.
न.म.जोशी म्हणाले, शक्ती व भक्ती ही देशासाठी गरजेची आहे. हाच विचार शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी आपल्याला दिला. त्यांच्या वाणीतून आणि लेखनातून आलेला विचार आजही आपण अंमलात आणतो. तोच संतांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
कलातीर्थचे संचालक अमोल काळे आणि विद्यार्थ्यांनी ही २५ भारतीय संतांची चित्रे रेखाटली आहेत. त्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवार, दिनांक २८ जानेवारी पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत विनामूल्य खुले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.